IND vs AUS : कॅप्टन रोहित BGT सीरिजमधील सामन्याला मुकणार? नेतृत्व कोण करणार?
Rohit Sharma India vs Australia Bgt Series 2024 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सुरुवातीच्या पहिल्या 2 पैकी कोणत्याही एका सामन्याला मुकावं लागू शकतं. यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

रोहितसेनेने बांगलादेशचा मायदेशात बांगलादेशला कसोटी मालकिते 2-0 ने व्हाईटवॉश दिला. त्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 16 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या कसोटी मालिकेकडे लागून आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाची आहे. यंदा बीजीटी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उभयसंघात 5 सामन्यांची मालिका होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या 2 पैकी कोणत्याही एका सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून एडलेड येथे आयोजित करण्यात आला आहे. रोहित या दोन्हीपैकी कोणत्याही एका सामन्यात खेळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी मोठा झटका समजला जात आहे.
रोहितकडून बीसीसीआयला पूर्वकल्पना?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका सामन्याला उपलब्ध नसल्याची पूर्वकल्पना बीसीसीआयला दिली आहे. मात्र रोहित नक्की कोणता सामना खेळणार नाही, हे स्पष्ट नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, “अजून याबाबत स्पष्टता नाही. मात्र रोहितने बीसीसीआयला पहिल्या 2 मधून कोणत्याही एका सामन्यात खेळता येणार नसल्याची पूर्वकल्पना दिली आहे. मात्र कसोटी मालिकेआधीच सर्व नीट झालं, तर रोहित संपूर्ण मालिकेत खेळेल. याबाबत येत्या काही दिवसात स्पष्ट होईल”.
रोहितच्या जागी कोण?
दरम्यान रोहितला कोणत्याही सामन्याला मुकावं लागलं तर त्याच्य जागी भारतीय संघात अभिमन्यू इश्वरन याला संधी मिळू शकते. अभिमन्यूने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफी आणि इराणी कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शतकी खेळी केली होती.
कर्णधार कोण असणार?
तसेच रोहितच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया सारख्या आव्हानात्मक दौऱ्यात नेतृत्व कोण करणार? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या क्षणाला प्रश्न अनेक आहेत, मात्र उत्तर नाही. त्यामुळे आता याबाबत काय अंतिम निर्णय होतो? हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.