विघ्नेश पुथूरबाबत सामना संपताच कर्णधार सूर्यकुमार यादवने मांडलं मत, 18वं षटकं सोपवलं कारण…
आयपीएल 2025 स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला पण विघ्नेश पुथूरने सर्वांची मनं जिंकली. मोठ्या स्पर्धांचा कोणताही अनुभव नसताना विघ्नेशने चमकदार कामगिरी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं.

आयपीएलचा हायव्होल्टेज सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. आतापर्यंत सुरु असलेल्या ट्रेंडप्रमाणे मुंबईने पहिला सामना गमावला. तर चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 4 विकेट आणि 5 चेंडू राखून जिंकला.मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावा दिल्या. खरं तर हे आव्हान आयपीएलच्या स्पर्धा पाहता सोपं होतं. पण चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळवण्यासाठी 20 व्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून चेन्नईने विजय मिळवला. या सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत आणली ती नवख्या विघ्नेश पुथूरने… कारण यापूर्वी प्रतिष्ठित अशा कोणत्याच स्पर्धेत खेळला नव्हता. पण मुंबई इंडियन्स त्याच्यासाठी डाव लावला आणि त्याला संघात घेतलं. प्लेइंग 11 मध्ये नव्हता पण इम्पॅक्ट प्लेयर म्हणून स्थान दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विघ्नेश पुथूरने 4 षटकात 32 धावा देत 3 गडी बाद केले. 24 वर्षीय विघ्नेशने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडली.
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवला पुथूरबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सूर्यकुमार त्याचं कौतुक करत म्हणाला की, ‘आम्ही 15 ते 20 धावांनी कमी पडलो होतो पण मुलांनी दाखवलेली झुंज कौतुकास्पद होती. आश्चर्यकारक, तरुणांना संधी देण्यासाठी मुंबई इंडियन्स ओळखले जाते. स्काउट्स 10 महिने हे करतात आणि विघ्नेश त्याचेच उत्पादन आहे. जर खेळ खोलवर गेला तर मी त्याचं एक षटक खिशात ठेवलं होत. पण त्याला 18वे षटक द्यायचं असं काही ठरवलं नव्हतं. दव पडले नव्हते, पण ते चिकट होते.’ विघ्नेशने 18 व्या षटकात 15 धावा दिल्या. पुथूरने तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेतला होता. केसीएल टी20 स्पर्धेत जागा मिळवली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सने नोव्हेंबर 2024 मेगा लिलावात 30 लाख रुपये खर्च करून त्याला संघात घेतलं.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत सलग 13व्यांदा पहिला सामना गमावला आहे. एमआयने शेवटचा हंगामातील पहिला सामना 2012 मध्ये जिंकला होता. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापासू चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सातपैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे.