पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफी संकटात! पीसीबी अध्यक्षांनी थेट दिले गोळी मारण्याचे आदेश
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान होणार आहे. मात्र भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजूनही वेळापत्रत निश्चित झालं नाही. असं असताना पाकिस्तानातील परिस्थिती बिकट झाली आहे आणि आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व तयारी केली आहे. यासाठी आयसीसीकडे प्रस्ताविक वेळापत्रकही सुपूर्द केलं आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही स्पर्धा आधीच अडचणीत आली आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करावी असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलला नकार दिला आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवीने सुरक्षेबाबत सर्वकाही व्यवस्थित असल्याचा दावा केला आहे. पण अचानक त्यांनी पाकिस्तानी सेनेला गोळ्या मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे पाकिस्तानातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानातील अंतर्गत स्थिती नाजूक आहे. तीन महिन्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन होत असताना देशातील परिस्थिती हिंसक झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करावी यासाठी त्यांचा पीटीआय पक्ष रस्त्यावर उतरला आहे. इतकंच काय तर राजधानी इस्लामाबादमध्ये हिंसक वातावरण तयार झालं आहे. सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.
पाकिस्तान मिडिया रिपोर्टनुसार, आंदोलकांना पांगवण्यात अपयश आल्यानंतर निमलष्करी दलाच्या सुरक्षारक्षकांनी अश्रूधुराचा मारा केला. तसेच रबरी गोळ्यांचा वापर करून आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. आंदोलकांनी थेट सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 4 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले आहेत. मोहसिन नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत.
Grey skies in Islamabad due to shelling and gas 🇵🇰💔
The video is from D Chowk today 🚨
— Farid Khan (@_FaridKhan) November 26, 2024
Protesters passing through the Blue area are chanting D-Chowk. pic.twitter.com/rGYqToavkG
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 26, 2024
पाकिस्तानातील स्थिती पाहता चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन तरी कसं करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम हे इस्लामाबादपासून अवघ्या 14-15 किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानची राजधानीतच सुरक्षित नसेल, तर रावळपिंडी, कराची किंवा लाहोरमध्ये सुरक्षेची हमी कशी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्ये वादही चिघळला आहे. या वादाने हिंसक वळण घेतलं असून 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. असं असताना चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसी 29 नोव्हेंबरला काय निर्णय घेते? याकडे लक्ष लागून आहे. आयसीसीने बोलवलेल्या वर्च्युअल मीटिंगमध्ये बीसीसीआय आणि पीसीबीचे सदस्य उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीत सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जाईल यात शंका नाही.