नवी दिल्ली : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची (Cheteshwar Pujara) बॅट इंग्लंडमध्ये (England) जोरदार धावत आहे. रॉयल लंडन वन डे चषकात (Royal London One Day Cup) त्याच्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. आता ससेक्सचा कर्णधार पुजाराने सॉमरसेटविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने सॉमरसेटच्या गोलंदाजांना चोप दिला आणि 66 चेंडूत 66 धावा केल्या. मात्र, यावेळी त्यांच्या साथीदाराने चाहत्यांची मनंही लुटली. ससेक्सचा सलामीवीर अली ओरने या सामन्यात द्विशतक झळकावले आहे. अलीने 161 चेंडूत 206 धावा केल्या. अली आणि पुजाराच्या जोरावर ससेक्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 5 बाद 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात सॉमरसेटचा संघ 196 धावांत गारद झाला. ससेक्सने हा सामना 201 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. कालची मॅच यासाठी विशेष होती. याविषयी आम्ही तुम्हाला अधिक महिती देणार आहोत…
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा अली हा 35 वा खेळाडू ठरला आहे. या 35 पैकी 8 वेळा हा पराक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाला, तर 27 वेळा लिस्ट ए मध्ये झाला. 21 वर्षीय अलीने आपल्या धडाकेबाज खेळीत 11 षटकार आणि 18 चौकार लगावले. अलीने पुजारालाही मागे सोडले. याआधी ससेक्सच्या खेळाडूच्या नावावर सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर होता. त्याने 5 दिवसांपूर्वी सरेविरुद्ध 174 धावा केल्या होत्या.
ससेक्सने एकवेळ 61 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर अली आणि पुजारा यांनी चौथ्या विकेटसाठी 140 धावांची अप्रतिम भागीदारी केली आणि धावसंख्या 201 धावांपर्यंत पोहोचवली. पुजारा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अलीने फिन आणि डेलरेसोबत भागीदारी करत धावसंख्या 386 धावांपर्यंत नेली. स्कॉटने 49.2 षटकांत अली ब्रुक्सचा झेल घेतला. डेलरे 23 चेंडूत 54 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार पुजाराने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.
फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर ससेक्सच्या गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी करत सॉमरसेटला 200 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. ब्रॅडली आणि जेम्स कोल्सने प्रत्येकी 3 बळी घेतले. त्याचवेळी हेन्री क्रोकोम्बेने 31 धावांत 2 बळी घेतले. सॉमरसेटकडून सलामीवीर अँड्र्यू उमेदने सर्वाधिक 56 धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉर्ज स्कॉटने 30 आणि जॅक ब्रूक्सने 28 धावा केल्या. खालच्या फळीतील फलंदाज अॅल्फीने नाबाद 27 धावा केल्या.