प्रशिक्षकपदी राहुल द्रविड राहणार की जाणार? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी आता तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यासाठी संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर प्रशिक्षकपदाचा कार्यभाराचं काय? असा प्रश्न उपस्थिती होत आहे. त्यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यभार होता. स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पण भारतीय टीम दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुल द्रविड यांनी कमबॅक केलं. मात्र करार केला नसल्याचं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं होतं. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड यांच्याकडे आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत राहुल द्रविड प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार की इतर कोणाला जबाबदारी दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नावर आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी उत्तर दिलं आहे. राहुल द्रविड टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतील यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
“वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी स्पर्धांपर्यंत रोहित शर्माचं कर्णधारपद कायम ठेवण्याच्या निर्णयावर येण्यापूर्वी मी द्रविडशी प्राथमिक चर्चा केली होती.”, असं जय शाह यांनी सांगितलं. वनडे वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांना दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जावं लागलं. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट झाली नव्हती. आता भेट झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट झालं आहे, असं जय शाह यांनी सांगितलं.
“टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत राहुल द्रविड हेच प्रशिक्षकपदी कायम राहतील. चर्चेत्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्याशी या विषयावर बोलेन. सध्या बॅक टू बॅक मालिका होत आहेत. आधी दक्षिण अफ्रिकेत होते, त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध मालिका झाला. आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे फारसं काही बोलता नाही.”, असं जय शाह यांनी सांगितलं.
रोहित शर्मा याच्या खांद्यावर टी20 वर्ल्डकप स्पर्धेची धुरा असणार आहे. तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आता विराट कोहली या स्पर्धेत खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.