IPL 2023 स्पर्धेदरम्यान खेळाडूंशी सट्टेबाजांचा संपर्क? मोहम्मद सिराजसोबत नेमक काय झालं?
IPL 2023 : आयपीएल स्पर्धा रंगतदार वळणावर आली असताना मोहम्मद सिराजनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे क्रीडाविश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालं वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रोज होणाऱ्या सामन्यानंतर गणित बदलत आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणाऱ्या सामन्यांमुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढत आहे. एक विजय किंवा पराभवामुळे स्पर्धेतील संघात स्थान वर खाली होत आहे. जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघ जीव तोडून मेहनत घेत आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मोहम्मद सिराजनं केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद सिराजला काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होतो, त्यात त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत मोहम्मद सिराजनं बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पीटीआयच्या बातमीनुसार, मोहम्मद सिराजने बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटकडे याबाबतची तक्रार केली आहे. मोहम्मद सिराजने सांगितलं की, एक अनोळखी व्यक्ती आयपीएलमध्ये खूप सारे पैसे गमवाल्यानंतर त्याने संपर्क साधला होता. तसेच संघातील आतील माहिती विचारत होता. सिराजने याबाबतची माहिती तात्काळ बासीसीआय अँटी करप्शन युनिटकडे दिली आहे.
रिपोर्टनुसार, मोहम्मद सिराजशी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती सट्टेबाज नसून हैदराबादमध्ये राहणारा एक ड्रायव्हर आहे. असं असलं तरी अँटी करप्शन युनिटने तपास सुरु केला आहे.
मोहम्मद सिराज अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यानंतर तात्काळ माहिती दिल्याने कौतुक होत आहे. यापूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनला असाच फोन आला होता. मात्र बीसीसीआय एसीयूला माहिती न दिल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
सिराजचं आयपीएल 2023 मधील कारकिर्द
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी हवी तशी चांगली नाही. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात त्याने एकूण 8 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट देखील 7 धावा प्रति ओव्हर आहेत. इतकंच काय तर चिन्नास्वामीच्या पाटा खेळपट्टीवरही त्याने चांगली गोलंदाजी केली.
आयपीएलवर स्पॉट फिक्सिंगचा ठपका
आयपीएल स्पर्धेवर यापूर्वी स्पॉट फिक्सिंगचा डाग लागला आहे. आयपीएल 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा श्रीसंतसह तीन खेळाडू या प्रकरणात अडकले होते. त्यांच्यावर क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती.