आईला केलेलं शेवटचं प्रॉमीस देखील पूर्ण करू शकलो नाही; अश्रू थांबत नव्हते, विनोद कांबळीने सांगितला तो भावनिक किस्सा
भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीला सध्या अनेक आजारांनी ग्रासलं आहे. आजारांसोबत त्याचा लढा सुरू आहे. त्याने आपल्या आयुष्यातील एक भावनिक किस्सा सांगितला आहे.
भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीला सध्या अनेक आजारांनी ग्रासलं आहे. आजारांसोबत त्याचा लढा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा आणि सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विनोद काळंबी चर्चेमध्ये आले. कधी काळी विनोद कांबळी हे भारताचे स्टार फलंदाज होते.एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असंच विनोद कांबळी यांचं आयुष्य आतापर्यंत राहिलं आहे.त्यांनी क्रिकेटसोबत अभिनयामध्ये देखील आपलं नशीब आजमावलं. मात्र त्यांना दोन्ही क्षेत्रात जास्त यश मिळू शकलं नाही.विनोद कांबळी यांनी आपल्या आईला एक वचन दिलं होतं, ते वचन देखील ते पूर्ण करू शकले नाहीत.
जेव्हा विनोद कांबळीच्या आईचं निधन झालं तेव्हा ते रणजी ट्रॉफी खेळत होते. रणजी ट्रॉफीची सेमीफायनल मॅच सुरू असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांच्या आईच्या मृत्यूपूर्वी त्यांचं तिच्याशी फोनवर बोलणं झालं होतं, आपण तुला लवकरच भेटायला येऊ असं प्रॉमिस त्यांनी आपल्या आईला केलं होतं. मात्र असं होऊ शकलं नाही, ते भेटायला येण्याच्या आधीच त्यांच्या आईचं निधन झालं.मॅच संपण्यापूर्वीच त्यांच्या आईनं जगाचा निरोप घेतला.विनोद कांबळी यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितं आहे.
हा प्रसंग सांगताना विनोद कांबळी म्हणाले की, मला अजूनही तो क्षण लक्षात आहे, ज्यावेळी माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी रणजी ट्रॉफीची सेमीफायनल मॅच खेळत होतो. माझं माझ्या आईसोबत बोलणं झालं होतं.मी तिला सांगितलं होतं की मी लवकरच तुला भेटायला येईल, मात्र मॅच संपून मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा माझ्या आईचं निधन झालं होतं.मी रडत होतो. माझ्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते, तेव्हा मला माझ्या वडिलांनी जवळ घेतलं आणि सांगितलं की तुझ्या आईचं स्वप्न होतं तू मोठा क्रिकेटर व्हावास, तू क्रिकेट खेळत राहावं. त्यानंतर मी जो सामना खेळला त्या सामन्यात प्रत्येक धाव काढताना मला आईची आठवण यायची माझे आश्रू थांबत नव्हते असं विनोद कांबळी यांनी म्हटलं आहे.