क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला निर्णय बदलला, डेविड वॉर्नरला मिळणार कर्णधारपद
डेविड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्ती घेताना त्याच्या मनात एक सळ कायम होती. अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय मागे घेतला असून कर्णधारपद भूषविता येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नर याने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र त्याच्या निवृत्तिनंतरही त्याच्यावर एक टांगती तलवार होती. अखेर डेविड वॉर्नरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलासा दिला आहे. ऑस्ट्रेलियाने त्याच्या कर्णधारपदाबाबत लाईफ टाईम बॅन टाकला होता. पण आता निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाने त्याच्यावरील हे बंधन दूर केलं आहे. 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगमुळे गोत्यात आला होता. वॉर्नरसोबत स्टीव्ह स्मिथही या प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे या दोघांवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. तसेच दोन्ही खेळाडू आजन्म क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवू शकत नाही, असा निर्णय दिला होता. त्यामुळे 2019 मध्या दोन्ही खेळाडूंनी कमबॅक केलं. पण संघाचं कर्णधारपद काही भूषवता आलं नाही. निवृत्तीपूर्वी डेविड वॉर्नरने ही सळ कायम बोलून दाखवली होती. मात्र निवृत्तीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे बंधन हटवलं आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात कर्णधारपद भूषवू शकणार आहे. बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सचं कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे.
वॉर्नरवर बंदी घातल्यानंतर सहा वर्षांनी ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. 25 ऑक्टोबरला कंडक्ट कमिशनच्या तीन सदस्यीय समितीने वॉर्नरवरील आजन्म कर्णधारपदाची बंदी काढून टाकली आहे. समितीने निरीक्षणात नोंदवलं की, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या नियमावलीत 2022 मध्ये बदल केले आहेत. त्यानुसार वॉर्नरवरील बंदी हटवली जावी असं स्पष्ट झाल्याने हा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये डेविड वॉर्नरचं योगदानही पाहिलं गेलं. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून डेविड वॉर्नरने निवृत्ती घेतली आहे. पण त्याचं मन काही रमताना दिसत नाही. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत खेळण्यासाठी सज्ज असल्याचं त्याने सांगितलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यात ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्टीव्ह स्मिथ ओपनिंगला फेल गेल्याने ही जागा आता रिकामी झाली आहे. त्यामुळे उस्मान ख्वाजासोबत ओपनिंगला कोण उतरेल याचा शोध सुरु आहे. यासाठी ट्रेव्हिस हेडचं नाव आघाडीवर आहे.