Video | एका ओव्हरमध्ये 6 सिक्स, युवा फलंदाजाचा धमाका, पाहा व्हीडिओ
6 Sixes An Over | 20 वर्षाच्या युवा फलंदाजाने तडाखेदार कामगिरी करत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अभिजीत प्रवीण असं त्याचं नाव आहे.
मुंबई | एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनाम मोजक्याच फलंदाजांना जमला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये युवा फलंदाजासाठी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणं उजव्या हाताचा खेळ झालाय की काय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही दिवसांपू्र्वी फेब्रुवारी महिन्यात आंध्र प्रदेशचा फलंदाज वामशी क्रिष्णा याने सीके नायडू स्पर्धेत रेल्वे विरुद्ध एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले होते. त्यानंतर आता आणखी एका युवा भारतीय फलंदाजाने असाच कारनामा केला आहे.
मार्च महिन्यातील पहिल्याच आठवड्यात अभिजीत प्रवीण या 20 वर्षीय युवा फलंदाजाने क्रिकेट वर्तुळात आपली छाप सोडली आहे. अभिजीतने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स झळकावत धमाका उडवून दिलाय. अभिजीतने नावियो यूथ ट्रॉफी अंडर 22 स्पर्धेत मास्टर्स क्लबकडून खेळताना ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.मास्टर्स कल्ब विरद्ध ट्रायडेंट क्रिकेट अकादमी यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात अभिजीत याने जो फ्रांसिस याच्या बॉलिंगवर हा कारनामा केला.
असे मारले 6 सिक्स
अभिजीतने फ्रांसिसच्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर लाँग ऑफच्या दिशेने सिक्स ठोकले. त्यांनतर तिसरा सिक्स डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला. चौथा सिक्स हा कॉर्नरच्या वरुन मारला. तर पाचवा आणि सहावा सिक्स लाँग ऑफच्या वरच्या दिशेने फटकावले. हा 30 ओव्हरचा सामना होता. या सामन्यातील 21 व्या ओव्हरमध्ये अभिजीतने ही कामगिरी केली.
एका ओव्हरमध्ये 6 सिक्स
अभिजीत 69 धावांवर खेळत होता. मात्र या एका ओव्हरमधील 6 सिक्ससह अभिजीतने 36 धावांसह शतकही पूर्ण केलं. मात्र शतकानंतर अभिजीत फार वेळ टिकला नाही. अभिजीतने 106 धावांवर आऊट झाला. अभिजीतच्या या शतकी खेळीत 10 सिक्स आणि 2 चौकारांचा समावेश होता.