दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूचं करिअर संपुष्टात, कोर्टाने सुनावली 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेल्या संदीप लामिछानेला आता 8 वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. अत्याचारप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जामिनावर बाहेर होता. पण कोर्टाच्या निर्णयामुळे त्याची रवानगी आता जेलमध्ये होणार आहे.
मुंबई : आयपीएल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेला नेपाळ क्रिकेटचा माजी कर्णधार संदीप लामिछानेला कोर्टाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या काळ्या कृत्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. नेपाळ कोर्टाच्या शिशिर राज ढकाल खंडपीठाने निकाल दंड आणि आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 29 डिसेंबरला त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला होता. याप्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची सुनावणीपूर्व कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, 20 लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली होती. बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला विदेशी लीगमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली होती. आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे संदीपच्या अडचणी वाढल्या आहेत.
न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने संदीपच्या शिक्षेला दुजोरा दिला आहे. कोर्टाच्या अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितलं की, “कोर्टाने संदीपला 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.” लामिछानेला शिक्षा सुनावली तेव्हा तो कोर्टात हजर नव्हता. संदीपच्या वकिलांनी सांगितलं की, ते या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. लामिछानेवर 2022 च्या ऑगस्ट महिन्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काठमांडूच्या हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचं जबाबात नोंदवलं होतं. त्यानंतर 12 जानेवारी 2023 रोजी जामिन मंजूर करण्यात आला होता.
दुसरीकडे, संदीप लामिछाने याने या संपूर्ण प्रकरणावर आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी अटकेपूर्वी संदीपने सोशल मीडियावर आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. तसेच आरोप चुकीचे असून निर्दोषतेसाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं सांगितलं होतं.
संदीप पहिल्यांदा 2016 मध्ये चर्चेत आला होता. अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर 2018 मध्ये आयपीएल खेळणारा पहिला नेपाळी क्रिकेटपटू ठरला होता. 20 लाखांच्या बेस प्राईसवर दिल्लीने संघात घेतलं होतं. संदीप लामिछानेने 2018 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. संदीपने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नेपाळसाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. संदीपने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत.टी20 फिरकी गोलंदाजाने 52 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.