मुंबई : शिखर धवन गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. क्रीडाप्रेमींना तो थेट आता आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळताना दिसेल. कारण सध्याची टीम इंडिया पाहता त्याला स्थान मिळणं कठीण आहे. दुसरीकडे, कौटुंबिक पातळीवरही शिखर धवन त्रस्त असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टने ही बाब अधोरेखित झाली आहे. शिखर धवनने मुलगा जोरावरच्या वाढदिवशी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, “तुला समोर बघून आता एक वर्ष झालं आहे आणि गेल्या तीन महिन्यांपासून मला प्रत्येक ठिकाणाहून ब्लॉग केलं जात आहे. यासाठी मी तुला बर्थडे विश करण्यासाठी तोच फोटो वापरत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
“मी तुला थेट भेटू शकत नाही पण टेलीपेथीच्या माध्यमातून मी तुझ्याशी जोडलो गेलो आहे. मला तुझा अभिमान आहे आणि मला माहिती आहे की तू नक्कीच चांगलं करत असशील. नक्कीच तू पुढे जात असशील.” अशी भावूक पोस्ट शिखर धवनने लिहिली आहे. “पप्पा तुझी कायम आठवण काढतो. तुझ्यावर कायम प्रेम करतो. कायम सकारात्मक असतो आणि हसतच त्या वेळेची वाट पाहात असतो. देवाच्या कृपेने आपण पुन्हा भेटू. खोडकर हो पण विध्वंसक होऊ नको. नेहमी सर्वांचं भलं कर. शांत, धीर आणि खंबीर हो.”, असं शिखर धवनने पुढे लिहिलं आहे.
“मी तुम्हाला रोज पाहू शकत नसलो तरी रोज संवाद करतो. तुमच्याशी बोलतो. तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारतो. मी काय करतो आणि माझ्या आयुष्यात नवी काय घडत आहे हे सर्व मी शेअर करतो. जोरावर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”, अशी पोस्ट शिखर धवनने लिहिली आहे.
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. आयशाचं पहिलं लग्न ऑस्ट्रेलियन उद्योगपतीशी झालं होतं. त्यांना आलिया आणि रिया अशा दोन मुली आहेत. त्या मुलींना स्वीकारत शिखरने आयशासोबत लग्न केलं. त्यानंतर दोघांना मुलगा झाला आणि त्याचं नाव जोरावर ठेवलं. 4 ऑक्टोबर 2023 रोजी आयशा आणि शिखरचा घटस्फोट झाला. पण मुलाच्या कस्टडीबाबत कोर्टाने निर्णय दिला नव्हता. कोर्टाने सांगितलं होतं की, धवन भारत आणि ऑस्ट्रेलियात मुलासोबत वेळ घालवू शकतो. तसेच व्हिडीओ कॉलवर बोलू शकतो.