राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनेक जण देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसात बीसीसीआयने याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. इतकंच काय तर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिल्याचं पाहायला मिळाल. या वर्षाच्या सुरुवातील या दोन्ही खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. असं असताना बीसीसीआयने आता इतर खेळाडूंनाही स्पष्ट इशारा दिला आहे. राष्ट्रीय संघातून फ्री असाल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल. पण यातून काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे की, स्टार क्रिकेटपटूनी राष्ट्रीय संघात खेळत नसल्यास त्यांनी देशांर्गत क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज राहावं. असं असलं तरी यातून तीन खेळाडूंना मुभा दिली गेल्याचं सांगण्यात येत आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना स्वत:च खेळायचं की नाही हा निर्णय घ्यावा लागेल.
तीन खेळाडूंव्यतिरिक्त कसोटी खेळणाऱ्या इतर खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी कमीत कमी एक किंवा दोन सामने खेळावे लागणार आहेत. दुलीप ट्रॉफीसाठी विभागीय निवड समितीऐवजी राष्ट्रीय निवड समितीच निवड करणार आहे. ऑगस्ट महिन्यात बांग्लादेश, तर सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका आहे. या दोन्ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मालिका भारतात होणार आहे. तर या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं की, “यावेळेस दुलीप ट्रॉफीसाठी विभागीय निवड समिती नसेल. राष्ट्रीय निवड समिती या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. या स्पर्धेसाठी कसोटी संघात दावा असणार्या खेळाडूंची निवड केली जाईल. फक्त रोहित, विराट आणि बुमराह आपल्या मर्जीने खेळायचं की नाही हा निर्णय घेतील. ” त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय संघात निवड झाली नसेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेटसाठी खेळाडूंना सज्ज व्हावं लागेल.