Video : सीएसके कर्णधार ऋतुराज गायकवाडने आरसीबीवर केली मिश्किल टीका, चाहते संतापले
आयपीएल मेगा लिलाव नुकताच पार पडला आणि दहाही संघ आता खेळाडूंसह सज्ज आहेत. 18व्या पर्वात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरसीबीनेही आपल्या पहिल्या जेतेपदासाठी कंबर कसली आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स असा सामना पाहायला मिळत आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड.. ऋतुराज गायकवाड याने नुकतीत बंगळुरुच्या INFYusion कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड याच्या हातात असलेला माईक बंद पडला. यावेळी त्याने विनोद बुद्धी वापरत एक टीपणी केली आणि तेच आता वादाचं कारण ठरत आहे. कार्यक्रमात माईक बंद झाल्यानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला पण सुरु झाल्यानंतर ऋतुराजच्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली असंच म्हणावं लागेल. कारण ऋतुराजने माईक सुरु होताच ‘हा आरसीबीचा चाहता असावा’ अशी मिश्किल टीपणी केली. त्याच्या वक्तव्याने सीएसकेचे चाहते खूश झाले पण आरसीबी चाहत्यांच्या मनाला लागलं. कारण आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामने हायव्होल्टेज असतात.
ऋतुराज इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या कर्णधारपदाच्या सुरुवातीची आठवण करून देत आरसीबीच्या चाहत्यांचा रोष आणखी वाढवला. ‘माझा कर्णधारपदाचा पहिला सामना आरसीबीविरुद्ध होता आणि आम्ही तो सामना जिंकला होता. माझ्यासाठी एक संस्मरणीय क्षण होता. कर्णधार म्हणून एमएस धोनीसह संघाचे नेतृत्व करणे हा एक चांगला अनुभव होता.’, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.
Bro Giving Thug 🗿 In Their Town Is 🔥🤣#RuturajGaikwad pic.twitter.com/TxlpQhwciH
— Aravind (@TVFP2) December 19, 2024
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर आरसीबीला एकदाही जेतेपद मिळवता आले नाही. आतापर्यंतच्या 17 पर्वात आरसीबीच्या पदरी निराशा पडली. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे आहे. तर यंदा आरसीबीने फाफला रिलीज केल्याने कर्णधारपदी कोण असेल याची उत्सुकता आहे. तसं पाहिलं तर विराट कोहलीच्या गळ्यातच कर्णधारपदाची माळ पडेल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे 18व्या पर्वात ऋतुराज विरुद्ध विराट असा सामना पाहायला मिळेल. मागच्या पर्वात आरसीबीने चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग रोखला होता. त्यामुळे ऋतुराजचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.