Asia Cup 2023 | महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात खेळलेल्या दोघांची श्रीलंका टीममध्ये आशिया कपसाठी निवड
2 players Selected In Asia Cup 2023 | महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात घडलेल्या 2 खेळाडूंची निवड ही 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेत झाली आहे.
कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंका इथे संयुक्तरित्या करण्यात आलंय. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आशिया कप स्पर्धेच्या काही तासांआधी संघाची घोषणा केली आहे. आशिया कपसाठी श्रीलंकेने 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात खेळलेल्या दोघांना आशिया कपसाठी संधी दिली आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी याच्या नावाचीही पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
आशिया कपमध्ये श्रीलंका आपला पहिला सामना हा 31 ऑगस्टला खेळणार आहे. श्रीलंकेसमोर या सामन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे.आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळलेल्या दोघांची निवड केली आहे. हे दोघे महेंद्रसिंह धोनी याच्या कॅप्टन्सीत आयपीएलच्या 16 व्या मोसमात सीएसकेसाठी खेळले होते.
दासून शनाका हा आशिया कपमध्ये श्रीलंकेचं कर्णधारपद सांभाळणार आहे. श्रीलंका ही गत आशिया चॅम्पियन आहे. श्रीलंकेने गेल्या वर्षी 2022 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप उंचावला होता. श्रीलंकेने दासून शनाका याच्या नेतृत्वात आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली होती.
ही चौकडी दुखापतीमुळे कचाट्यात
तसेच चौघांना दुखापतीमुळे श्रीलंका क्रिकेट टीममधून बाहेर व्हावं लागलं आहे. या चौघांमध्ये दुष्मंथा चमीरा, दिलनाश मदुशंका, वानिंदु हसरंगा आणि लाहिरु कुमारा यांचा समावेश आहे. या चौघांच्या दुखापतीमुळे टीममध्ये युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या दोघांना संधी
आशिया कपसाठी श्रीलंका टीममध्ये मथीशा पथीराणा आणि महेश तीक्षणा या दोघांना संधी मिळाली. या दोघांनी आयपीएल 16 व्या हंगामात चेन्नईला चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल 2023 मध्ये महेश तीक्षणा याने 13 आणि पथीराणा याने 19 विकेट्स घेतल्या होत्या.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.