World Cup 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम जाहीर, 2 अनुभवी खेळाडूंचं कमबॅक
Netherlands World Cup 2023 Squad | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून मोठ्या जल्लोषात सुरुवात होणार आहे. त्याआधी आता नेदरलँड क्रिकेटने 15 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे.
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेला मोजून महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्याआधी वर्ल्ड कपसाठी एकएक टीमची घोषणा केली जात आहे. बीसीसीआयने 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. तसेच वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. आता 7 सप्टेंबर रोजी नेदरलँड क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीममध्ये 2 दिग्गजांची एन्ट्री
स्कॉट एडवर्ड्स हा नेदरलँडचं वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे. सोबतच तो विकेटकीपरची भूमिकाही बजावणार आहे. स्कॉट एडवर्ड्स यानेच गेल्या वर्षी म्हणजेच आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडचं कर्णधारपद सांभाळलं होतं. वर्ल्ड कपसाठी टीममध्ये 2 अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रूलोफ वेन डेर मेरवे आणि कॉलिन एकरमॅन यांचा समावेश आहे.
वर्ल्ड कपसाठी नेदरलँड टीम
The 15 men who will represent The Netherlands in the #CWC23 starting next month.
Wicketkeeper Batter Noah Croes and Fast Bowler Kyle Klein will be the two travelling reserves in the squad.
🇮🇳, here we come! 💪 pic.twitter.com/bTXvVzdZPM
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) September 7, 2023
नेदरलँडचा पहिला सामना केव्हा?
नेदरलँड वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 6 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. या सामन्यात नेदरलँडसमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्याआधी नेदरलँड 2 सराव सामने खेळणार आहेत. नेदरलँड ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया विरुद्ध सराव सामने खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सराव सामना हा 30 सप्टेंबरला पार पडणार आहे. तर टीम इंडिया विरुद्ध सराव सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे.
नेदरलँड 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपसाठी पात्र
नेदरलँडने 12 वर्षानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं आहे. नेदरलँडने याआधी भारतात 2011 साली झालेला अखेरचा वनडे वर्ल्ड कप खेळला होता. नेदरलँडने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमधून श्रीलंकेनंतर क्वालिफाय केलं.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 8 संघांनी आयसीसी रँकिंगच्या आधारावर थेट क्वालिफाय केलं. तर उर्वरित 2 संघांची निवड ही आयसीसी वर्ल्ड कप क्वलिफायर स्पर्धेतून क्वालिफाय होणार होती. त्यासाठी एकूण 10 संघांमध्ये 18 जून ते 9 जुलैदरम्यान आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून श्रीलंकेने आधी क्वालिफाय केलं. श्रीलंका वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणारी नववी आणि नेदरलँड दहावी टीम ठरली. नेदरलँडने 6 जुलै रोजी स्कॉटलँडवर मात करत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं.
नेदरलँड उपविजेता
तसेच त्यानंतर 9 जुलै रोजी श्रीलंका विरुद्ध नेदरलँड यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप क्वालिफायर अंतिम सामना पार पडला. त्या सामन्यात श्रीलंकाने 128 धावांनी बाजी मारली. तर नेदरलँड उपविजेता ठरला.
वर्ल्ड कप 2023 साठी नेदरलँड क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.