DC vs CSK : ऋषभ पंत याचा तडाखा, चेन्नई विरुद्ध अर्धशतकी धमाका
Rishabh Pant Fifty : ऋषभ पंत याने दिल्लीसाठी ओपनर डेव्हीड वॉर्नर याच्यानंतर झंझावाती अर्धशतक ठोकलंय.
टीम इंडियाचा लाडका विकेटकीपर बॅट्समन आणि दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने अपघातानंतर सर्वांना अपेक्षित अशी खेळी केली आहे. पंतने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 13 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खणखणीत अर्धशतक ठोकलंय. पंतने चौकारासह अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 16 वं अर्धशतक ठरलं. पंतने या अर्धशतकासह आपल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपवली.
ऋषभ पंत याने रस्ते अपघातानंतर तब्बल 15 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं. पंत अपघातानंतर आधीसारखा खेळू शकणार नाही, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये होती. तर दुसऱ्या बाजूला पंतकडून त्याच्या खास शैलीतील खेळीची प्रतिक्षा होती. अशात पंतने अर्धशतक ठोकून क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त खेळी करुन दाखवली. तसेच आपण आधीसारखं खेळू शकतो, हे देखील पंतने सिद्ध केलं.
ऋषभ पंतने चौकारासह हे अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभने 31 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह 164.52 च्या स्ट्राईक रेटने फिफ्टी पूर्ण केली. ऋषभने ही खेळी दिल्ली अडचणीत असताना केली. पृथ्वी शॉ आणि डेव्हीड वॉर्नर या सलामी जोडीने 93 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर मथीशा पथीराणा याने अप्रतिम कॅच घेत वॉर्नरला 52 धावांवर आऊट केलं. त्यानंतर पथीराणा याने एकाच ओव्हरमध्ये दिल्लीला 2 झटके दिले. पथीराणा याने पृथ्वी शॉ याला 43 धावांवर आऊट केलं. तर मिचेल मार्श याला भोपळाही फोडू दिला नाही. ऋषभने अशा स्थितीत चेन्नईवर वरचढ होत ही अर्धशतकी खेळी केली.
टीम इंडियासाठी गूड न्यूज
दरम्यान ऋषभची ही अर्धशतकी खेळी क्रिकेट चाहत्यांसह टीम इंडियाला दिलासा देणारी आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पंतची ही खेळी महत्त्वपूर्ण आहे. आयपीएलनंतर काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे पंतचा निश्चितच विचार केला जाऊ शकतो.
व्वा पंत व्वा
A ferocious display from our tigers at Vizag ✅🐯
Onto our bowlers⏳🤞#YehHaiNayiDilli #IPL2024 #DCvCSK pic.twitter.com/dplb9NTytZ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 31, 2024
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान