सावधान..! सावधान..! दिल्ली पोलिसांचा धोनीबाबत डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न, वाचा नेमकं काय सांगितलं ते
आयपीएल 2024 स्पर्धेचा शेवटचा टप्पा आहे. क्वॉलिफायर, एलिमिनेटर फेरीनंतर जेतेपदाचा मानकरी कळणार आहे. या स्पर्धेतून पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ बाहेर गेले आहेत. असं असताना दिल्ली पोलिसांनी धोनी संदर्भात एक प्रश्न विचारून नागरिकांना सावधान केलं आहे. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी एक्सवर शेअर केला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत गेल्या दोन महिन्यांपासून उत्कंठावर्धक सामन्यांची पर्वणी क्रीडाप्रेमींना मिळाली. अतितटीच्या सामन्यात आपल्या लाडक्या संघासाठी जीव तळहातावरून घेऊन बसण्याची वेळ आली होती. या सर्व चक्रातून प्लेऑफ फेरीत चार संघांनी बाजी मारली आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आहे. असं सर्व आयपीएल संदर्भातलं वातावरण असताना दिल्ली पोलिसांनी चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज महेंद्रसिंह धोनीबाबत एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न पाहिल्यानंतर अनेकजण बुचकळ्यात पडले होते. मात्र शेवटी त्यांना दिल्ली पोलिसांचं म्हणणं पटलं. या व्हिडीओमागे दिल्ली पोलिसांचा वेगळाच हेतू आहे.दिल्ली पोलिसांनी एक मेसेज लिहिला आहे की, “आयपीएल फक्त खेळाडूंनाच नाही तर तुम्हालाही कोट्यधीश बनवू शकते, फक्त काही साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका खूप सारी बक्षिसं.” त्याखाली क्लिक करण्यासाठी एक पर्याय दिला आहे. क्लिक केल्यावर एक प्रश्न स्क्रीनवर येतो.
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत हा प्रश्न आहे. या प्रश्नात विचारलं गेलं की, धोनीने आपला शेवटचा आयपीएल सामना कोणाविरुद्ध खेळला? या प्रश्नासाठी चार पर्याय दिले गेले आहेत. त्यात आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचं नाव आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत आयपीएलबाबत काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे शेवटचा सामना आहे की नाही हे स्पष्ट नाही. पण अनेकांनी लगेच आरसीबी उत्तर सांगून मोकळे झाले आहेत. पण व्हिडीओ पुढे बघितल्यावर डोळे उघडल्याशिवाय राहात नाही.
इनाम जीतने का लालच सबकुछ न हरवा दे।
सतर्क रहें – सावधान रहें #IPL #MSD pic.twitter.com/MqFlsEmlJ6
— Delhi Police (@DelhiPolice) May 20, 2024
आरसीबीवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज येतो की, “एकदम योग्य उत्तर तुम्ही जिंकलात 5000 रुपये..खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली बँक डिटेल्स भरून लगेचच जिंकलेली रक्कम आपल्या खात्यात वर्ग करा.” यानंतर लगेचच एक STOP चा मेसेज येतो. पोलिसांचं एक एनिमेटेड कार्टून येतं आणि लोकांना सावध करते की, इतका सोपा प्रश्न तुम्हाला संकटात टाकेल.
व्हिडीओमध्ये दिल्ली पोलिसांकडून पुढे सांगण्यात आलं आहे की, सध्या अशाप्रकारचे अनेक स्कॅम समोर येत आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी मेसेजला रिप्लाय करू नका. हा व्हिडीओ सायबर क्राईमकडून तयार केला गेला आहे. व्हिडीओच्या शेवटी सायबर क्राईमकडून संबंधित माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दिली गेली आहे.