डॉन ब्रॅडमन यांच्या टोपीचा लिलाव, अवघ्या 10 मिनिटात मिळाला कोट्यवधींचा भाव
क्रिकेटच्या पटलावर सर डॉन ब्रॅडमन यांचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलं गेलं आहे. त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आजही त्यांच्या नावावरील काही विक्रम अबाधित आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. पण 20 वर्षांच्या कसोटी कारकिर्दितीने अनेक विक्रम आजही आजरामर आहे.
सर डोनाल्ड ब्रॅडमन अर्थात डॉन ब्रॅडमन क्रिकेट विश्वातील मोठं नाव.. डॉन ब्रॅडमन यांचं नाव घेतल्याशिवाय क्रिकेटचं वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही. त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दित अनेक विक्रमांना गवसणी घातली. 30 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांनी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तर शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्धच 14 ऑगस्ट 1948 रोजी खेळला. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दित 52 कसोटी सामने खेळले आणि 80 डावात त्यांनी एकूण 6996 धावा केल्या. यात 334 ही त्यांची सर्वोत्तम खेळी राहिली. त्यांनी 29 शतकं आणि 13 अर्धशतकं ठोकली. यात 12 द्विशतकं आणि तीन त्रिशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीतही त्यांनी आपला हात आजमावला होता. त्यांनी 158 चेंडू टाकले आणि 72 धावा देत 2 गडी बाद केले. त्यांची फलंदाजी सरासरी 99.94 इतकी होती. क्रिकेट इतिहासात एका फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावांची सरासरी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा कधी विक्रमांची चर्चा होत असते, तेव्हा डॉन ब्रॅडमन हे नाव चर्चेत असतेच. आज पुन्हा सर डॉन ब्रॅडमन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत राहिली ती त्यांची कसोटी क्रिकेटमधील बॅगी ग्रीन कॅप..
क्रिकेटच्या मैदानावर द डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रॅडमन यांचं 2001 मध्ये निधन झालं. तेव्हा त्यांचं वय 92 वर्षे होतं. सर डॉन ब्रॅडमन यांचं निधन होऊन 24 वर्षे लोटली आहेत. मात्र आजही त्यांची जादू कायम आहे. त्यांच्या टोपीचा नुकताच लिलाव करण्यात आला. पण या लिलावात आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. सिडनी येथे झालेल्या लिलावात 1947-48 च्या भारताविरुद्धच्या मालिकेत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांनी परिधान केलेल्या प्रसिद्ध ‘बॅगी ग्रीन’कॅपचा लिलाव करण्यात आला. दिग्गज क्रिकेटपटूच्या या कॅपचा 10 मिनिटांपेक्षा कमी कालावधीत $479,700 (रु. 2.63 कोटी) लिलाव झाला. डॉन ब्रॅडमन यांनी 76 वर्षांपूर्वी शेवटची ही कॅप परिधान केली होती.
हीच कॅप घालून ब्रॅडमनने केवळ 6 डावात 178.75 च्या सरासरीने 715 धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि एका द्विशतकाचा समावेश आहे.फॉक्स स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, ही अनोखी कॅप ब्रॅडमन यांनी स्वत: भारतीय टूर मॅनेजर पंकज “पीटर” कुमार गुप्ता यांना भेट दिली होती. बोनहॅम्सने या टोपीचा लिलाव केला होता.