रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या रणनितीमुळे सूर्यकुमार यादव याला वनडेत बसतोय फटका, कसं ते जाणून घ्या
सूर्यकुमार यादव जगातील सर्वोत्तम टी20 खेळाडूंपैकी एक आहे. पण वनडेत त्याची हवी तशी जादू दिसली नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला वनडेत ग्रहण लागण्याचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊयात..
मुंबई : सूर्यकुमार यादव हे नाव क्रिकेटविश्वात सध्या गाजतंय. त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबत वेगळ्या शॉट्समुळे गोलंदाजांचं रणनिती फेल होत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात सूर्यकुमार यादवे याने 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. असं असताना टी20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला वनडेत सूर का गवसत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याने या प्रश्नाचं अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची रणनिती मारक ठरल्याचं दिसून येत आहे.
सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या टी20 सामन्यातील विजयानंतर सांगितलं की, “मला माहिती आहे की वनडेत माझी कामगिरी निराशाजन आहे. पण याबाबत मला काहीच वाटत नाही. मला वनडे फॉर्मेटमध्ये कमीत कमी 45 ते 50 चेंडू खेळायचे आहेत, असं राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी सांगितल आहे.” हीच रणनिती सूर्यकुमार यादव याच्यासाठी मारक ठरत असल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहेत.
सूर्यकुमार यादव याच्यावर प्रेशर
वनडेत 45 ते 50 चेंडू खेळण्याचं ओझं जर सूर्यकुमार यादव याच्यावर टाकलं तर दबावात खेळावं लागेल. जर इतक्या सामना करायचं डोक्यात सुरु असेल तर त्याचा परिणाम फलंदाजीवर होईल यात शंका नाही. खेळ बदलला की अपयशाची पायरी चढावीच लागणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये सूर्यकुमार यादव 45 ते 50 चेंडू खेळण्याच्या हिशेबाने मैदानात उतरतो. तर टी20 मध्ये असं काही डोक्यात नसतं. फक्त चेंडूच्या हिशेबाने शॉट खेळायचं इतकंच ठरलेलं असतं. मात्र वनडे फॉर्मेटमध्ये त्याची बॉडी लँग्वेज काही वेगळीच असते.
खेळताना एकदा का आत्मविश्वास गमावला की त्यातून अपयशच पदरी पडतं. सूर्यकुमार यादव याच्यासोबत असंच होत आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. एकीकडे वनडे फॉर्मेटमध्ये सूर गवसत नाही. दुसरीकडे,टी20 मध्ये आक्रमकपणे खेळत आहे. म्हणजेच डोक्यावर ओझं नसेल तर तो बिनधास्तपणे खेळतो, असंच म्हणावं लागेल