दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने गोलंदाजी निवडली. प्रथम गोलंदाजी करताना इंडिया ए संघाच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. पण मधल्या फळीतील शम्स मुलानी त्यांच्यावर भारी पडला. त्याने 187 चेंडूत 89 धावा केल्या. तसेच त्याला तरुण कोटियनची साथ मिळाली. त्याने 80 चेंडूत 53 धावांची खेळी केली आणि संघाला 290 धावांपर्यंत पोहोचवलं. या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ गडबडला. कर्णधार श्रेयस अय्यरला आपल खातं खोलता आलं नाही. त्यामुळे संघाला सर्वबाद 183 धावांपर्यं मजल मारता आली. इंडिया ए संघाकडे 107 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात इंडिया ए संघाने त्यात 3 गडी बाद 380 धावा जोडल्या. प्रथम सिंगने 122 आणि तिलक वर्माने 111 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघापुढे 487 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान खरं तर खूपच मोठं होतं आणि सावध खेळीशिवाय पर्याय नव्हता.
विजयी धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या संघाला सुरुवातीलाच धक्का बसला.अथर्व तायडेला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर रिक भूईने एका बाजूने मोर्चा सांभाळला आणि 195 चेंडूत 113 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 41, संजू सॅमसनने 40 धावांची खेळी केली. पण विजयी धावांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आलं. दोघांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. श्रेयस अय्यरचा संघ सर्वबाद 301 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंडिया संघाने 186 धावांनी विजय मिळवला. इंडिया डी संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
दुसऱ्या डावात इंडिया ए संघाकडून तनुष कोटियनने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शम्स मुलानीने 3 गडी, खलील अहमद आणि रियान परागने प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता इंडिया डी संघाचा पुढचा आणि शेवटचा सामना इंडिया बी संघासोबत आहे. हा सामना 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. पण या सामन्यात विजय मिळवूनही इंडिया डी संघाला काही एक उपयोग होणार नाही. कारण दोन सामन्यात पराभव झाल्याने 0 गुणांसह तळाशी आहे.