4,4,4,4,4,4,4,4,4,4,6,6,6..! संजू सॅमसनने शेवटच्या सामन्यात राग काढला, अशी केली गोलंदाजांची धुलाई
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेचा शेवटचा सामना सुरु आहे. इंडिया बी आणि इंडिया डी हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात संजू सॅमसनचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. संजू सॅमसनने 107.23 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या.
दुलीप ट्रॉ़फी स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील इंडिया डी संघाची स्थिती एकदम वाईट आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संघात स्थान मिळालं नव्हतं. दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला संघात घेतलं होतं. पण काही खास करू शकला नाही. पण तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात संजू सॅमसनचं रौद्र रुप पाहायला मिळालं. संजू सॅमसनने टी20 स्टाईलने इंडिया डी संघाला चांगल्या स्थितीत आणलं आहे. त्याने आपल्या या खेळीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संजू सॅमसन नाबाद 89 धावांवर तंबूत परतला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या 11 धावांची गरज आहे. संजू सॅमसनने 83 चेंडूत 89 धावांची खेळी केली. त्याने 107.23 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या आहेत. यात खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत संजू सॅमसनचं हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या डावात फक्त 5 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात 40 धावांचं योगदान दिलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील नाबाद 89 धावांची खेळी त्याच्यासाठी बुस्टर देणारी आहे. कारण टीम इंडिया कसोटी मालिकेनंतर बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे संघात जागा मिळवण्यासाठी संजू सॅमसनला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.
एकीकडे, संजू सॅमसनह देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत, रिकी भुई हे खेळाडू चमकले. तर दुसरीकडे, कर्णधार श्रेयस अय्यरला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे त्याचं कसोटीतील पुनरागमन आता खूपच कठीण झालं आहे. आता तर त्याला कसोटी थेट 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतरच स्थान मिळेल असं दिसत आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील इंडिया डी संघाचं जेतेपदाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता विजय मिळवला तरी जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. कारण गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला जेतेपद मिळणार आहे.