Riyan Parag | तूफानी शतक, मग 4 विकेट्स, आयपीएल मध्ये ट्रोल होणारा रियान पराग याचा देवधर ट्रॉफीत धमाका
Riyan Parag All Rouned Performence | रियान पराग याने देवधर ट्रॉफीत आधी शतक ठोकलं त्यानंतर 4 विकेट्सही घेतल्या. रियान पराग याने आजचा दिवस गाजवला.
पुद्देचरी | देवधर ट्रॉफी 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यात इस्ट झोनने नॉर्थ झोनला 88 धावांनी पराभूत केलं. रियान पराग याने केलेल्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर इस्ट झोनने विजय मिळवला आहे. इस्ट झोनला विजय मिळवून देण्यात रियानने मोठा वाटा उचलला. या सामन्यात रियान पराग याचा ‘वन मॅन शो’ पाहायला मिळाला. रियान पराग हा टीमच्या विजयाचा हिरो ठरला. रियानने टीम अडचणीत असताना आधी निर्णायर क्षणी बॅटिंगला येत शतक ठोकलं. तर त्यानंतर 4 विकेट्स घेत नॉर्थ झोन टीमला ब्रेक लावला.
रियान परागसमोर नॉर्थ झोन गपगार
रियानने नॉर्थ झोन विरुद्धच्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. इस्ट झोनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणं चुकीचा ठरतोय असं दिसत होतं. कारण इस्ट झोनची 5 बाद 57 अशी स्थिती झाली होती. मात्र रियान पराग याने फक्त 102 बॉलच्या मदतीने रियानने 131 रन्सची शतकी खेळी केली. रियानने या झंझावाती खेळी दरम्यान 11 गगनचुंबी सिक्स आणि 5 फोरही लगावले. तसेच रियान पराग आणि कुमार कुशाग्रा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 235 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीमुळे इस्ट झोनला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 337 धावांचा डोंगर उभारता आला.
नॉर्थ झोन टीमला 338 धावांचं आव्हान
नॉर्थ झोनला विजयासाठी 338 रन्सचं टार्गेट मिळालं. आता इथेही रियान पराग नॉर्थ झोन आणि विजयात आडवा आला. रियानने आधी गोलंदाजांना झोडल्यानंतर फलंदाजांची खाट टाकायला सुरुवात केली. रियानने आपल्या 10 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 57 धावांच्या मोबदल्यात 4 महत्वाचा विकेट घेतल्या. रियानने हिमांशू राणा, मनदीप सिंह, शुभम रोहिला आणि संदीप शर्मा या चौकडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
नॉर्थ झोनकडून मनदीप सिंह याने राउंड फिगर 50 धावा केल्या. अभिषेक शर्मा 44 धावा करुन माघारी परतला. शुभम रोहिला याने 41 आणि हिमांशू राणाने 40 रन्स केल्या. तर रियान व्यतिरिक्त इस्ट झोनकडून शाहबाज अहमद याने 9.3 ओव्हरमध्ये 41 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. शाहबाजने रियानला चांगली साथ दिली.
रियानची दुर्मिळ कामगिरी
दरम्यान रियानने केलेली कामगिरी ही देवधर ट्रॉफी स्पर्धेतील दुर्मिळ कामगिरी ठरली. एकाच सामन्यात खेळाडूने बॅटिंगसह बॉलिंगने अशी कामगिरी करणं ही खरचं कौतुकास्पद बाब आहे. तसेच या कामगिरीमुळे रियान परागच्या विश्वासातही चांगलीच वाढ व्हायला निश्चितच मदत होईल.
नॉर्थ झोन प्लेईंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), हिमांशू राणा, मनदीप सिंग, निशांत सिंधू, शुभम रोहिल्ला, हर्षित राणा, मयंक मार्कंडे, संदीप शर्मा आणि मयंक यादव.
इस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | सौरभ तिवारी (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, उत्कर्ष सिंग, रियान पराग, विराट सिंग, सुभ्रांशु सेनापती, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मुख्तार हुसेन, आकाश दीप आणि मणिशंकर मुरासिंग.