ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने रविवारी पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर डीएसनुसार 49 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने यासह मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3-2 मालिका जिंकली. इंग्लंडच्या पराभवामुळे बेन डकेट याची शतकी खेळी व्यर्थ गेली. इंग्लंडचा डाव हा 49.2 ओव्हरमध्ये 309 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने विजयी धावांचा शानदार पाठलाग केला. मात्र सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 20.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 165 धावा केल्या होत्या. पावसाच्या विघ्नामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. पाऊस थांबून खेळाला सुरुवात होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पाऊस न थांबल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं.
इंग्लंडच्या बेन डकेट याने शतकी खेळी केली. डकेटने 91 बॉलमध्ये 107 रन्स केल्या. डकेटने या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर कॅप्टन हॅरी ब्रूकने अर्धशतकी खेळी केली. ब्रूकने 52 चेंडूत 72 धावा केल्या. फिलीप सॉल्टने 45 तर आदिल रशीदने 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर एरॉन हार्डी, एडम झॅम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाने 310 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. ट्रेव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट या दोघांनी 78 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर हेड आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. हेडने 26 चेंडूत 31 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने 30 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. शॉर्टने या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार खेचले. तर पावसामुळे खेळ थांबला तेव्हा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ आणि जोश इंग्लिस ही जोडी नाबाद परतली. स्टीव्हनने 36 आणि इंग्लिसने 28 धावा केल्या. तर मॅथ्यू पॉट्स आणि ब्रायडन कार्स या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
Australia stormed ahead of the DLS par score to seal the ODI series 3-2 against England 💪
📝 #ENGvAUS: https://t.co/U9zizLFBG5 pic.twitter.com/h09LuyBXYZ
— ICC (@ICC) September 29, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कॅप्टन), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन आणि आदिल रशीद.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.