मुंबई: इंग्लंडच्या क्रिकेट टीमने लॉर्ड्सच्या मैदानावर (Lord Test) खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पाच विकेटने हरवलं. न्यूझीलंडने इंग्लंडला (ENG vs NZ) विजयासाठी 277 धावांचं लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडने पहिल्या डावातील चूकांमधून बोध घेतला. माजी कर्णधार जो रुटच्या (Joe Root) दमदार शतकाच्या बळावर रविवारी चौथ्या दिवशीच इंग्लंडने न्यूझीलंडवर पाच विकेट राखून विजय मिळवला. नवीन कर्णधार बेन स्टोक्स आणि नवीन टेस्ट कोच ब्रँडन मॅक्क्लम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने विजयी सुरुवात केली आहे. दोन्ही टीम्स पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारु शकल्या नव्हत्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात फक्त 132 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा दुसरा डाव 141 धावात आटोपला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 285 धावा करुन इंग्लंडला चांगलं लक्ष्य दिलं होतं.
जो रुटने दुसऱ्याडावात फलंदाजी करताना 170 चेंडूत नाबाद 115 धावा केल्या. यात 12 चौकार लगावले. कॅप्टनशिप सोडल्यानंतर रुटसाठी हा पहिला सामना होता. त्याने आपल्या पूर्वीच्या रुपात दर्जेदार फलंदाजी केली. करीयरमधील त्याचं हे 26 व शतक होतं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या 10 हजार धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. कॅप्टन बेन स्टोक्सने 54 धावा केल्या. 110 चेंडूत स्टोक्सने अर्धशतकी इनिग खेळताना पाच चौकार आणि तीन षटकार लगावले.
लॉर्ड्स कसोटीत चौथ्या दिवशी शतक पूर्ण करण्यासाठी जो रुटला 23 धावांची आवश्यकता होती. त्याने एकातासाच्या आता शानदार शतक झळकावलं. या 23 धावांबरोबर रुटने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रुट इंग्लंडचा दुसरा फलंदाज आहे. याआधी दिग्गज फलंदाज एलिस्टर कुकने अशी कामगिरी केली होती. रुटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला पाच विकेटने हरवलं.
रुटने 218 कसोटी डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या. याआधी फक्त कुकने इंग्लंकडून इतक्या धावा केल्या आहेत. कुकने 31 वर्ष 157 दिवसात 10 हजार धावा पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा कमी वयात 10 हजार धावा करण्याचा विक्रम मोडला होता. रुटने सुद्धा 31 वर्ष 157 दिवसात ही कमाल केली आहे