ENG vs SL Head To Head: श्रीलंकेची इंग्लंडसमोर ‘कसोटी’, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
English vs Sri Lanka Head To Head: श्रीलंकेने घरच्या मैदानात टीम इंडियाचा 27 वर्षांनंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेचा विश्वास दुणावलेला आहे. मात्र त्यांच्यासमोर आता इंग्लंडचं आव्हान असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ओली पोप हा इंग्लंडचा कॅप्टन आहे. तर धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. इंग्लंडने आपल्या शेवटच्या कसोटी मालिकेत 3-0 अशा फरकाने विंडिजला पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडचा अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच घरात कसोटी मालिका असल्याने इंग्लंडला आणखी फायदा होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेची इंग्लंडसमोर खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. आता पहिल्या सामन्यात कोण कुणावर वरचढ ठरणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 17 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. इंग्लंडने या 17 पैकी 9 मालिका जिंकल्या आहेत. तर श्रीलंकेला अवघ्या 5 मालिका विजयांवर समाधान मानावं लागलं आहे. तर 3 मालिका या बरोबरीत राहिल्या. श्रीलंकेने इंग्लंडमध्ये 2 मालिका जिंकल्या आहेत तर 5 गमावल्या आहेत. श्रीलंकेने 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती.
इंग्लंड श्रीलंकेवर वरचढ
इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 36 कसोटी सामने झाले आहेत. इंग्लंडने 36 पैकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने 8 वेळा इंग्लंडला पराभवाची धुळ चारली आहे. तर 11 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. तर श्रीलंकेने इंग्लंडमध्ये केवळ 3 सामने जिंकले आहेत, तर 8 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर 7 सामने बरोबरीत सुटले.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रथनायके,
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर