ENG vs SL: श्रीलंकेचा 10 वर्षांनी ऐतिहासिक विजय, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 8 विकेट्सने मात
Engaland vs Sri Lanka 3rd Test Match Result: श्रीलंकेने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. ओपनर पाथुम निसांका हा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
श्रीलंका क्रिकेट टीमने इतिहास रचत इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड आणि अविस्मरणीय असा केला आहे. श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान पाथुम निसांका याच्या नाबाद खेळीच्या जोरावर 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. तसेच अँजलो मॅथ्युज यानेही निसांकाला अप्रतिम साथ दिली. निसांका आणि मॅथ्युज या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. श्रीलंकेने यासह इंग्लंडमध्ये 10 वर्षांनंतर कसोटी सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेने इंग्लंडला त्यांच्यात घरात दशकापूर्वी 2014 साली पराभूत केलं होतं. श्रीलंकेच्या या विजयामुळे इंग्लंडचं क्लिन स्वीप करण्याचा स्वप्न भंग झालं. मात्र त्यानंतरही इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात दिमुथ करुणारत्ने याने 8 तर कुसल मेंडीसने 39 धावा जोडल्या. तर त्यानंतर पाथुम आणि अँजलोने श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. पाथुमने 124 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 127 धावांची नाबाद खेळी केली. तर अँजलो मॅथ्यूज याने 61 बॉलमध्ये 3 फोरसह नॉट आऊट 32 धावा जोडल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि गस एटकीन्सन या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
सामन्याचा धावता आढावा
इंग्लंडने पहिल्या डावात कॅप्टन ओली पोप याच्या 154 धावांच्या खेळीच्या जोरावर 325 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेने प्रत्युत्तरात 61.2 ओव्हरमध्ये 263 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 64 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे इंग्लंडकडे दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून आघाडी घेण्याची संधी होती. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव हा 34 ओव्हरमध्ये 156 धावांवर आटोपला. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 219 धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसापर्यंत 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी आणखी 125 धावांची गरज होती. श्रीलंकेने उर्वरित 125 धावा या 1 विकेट गमावून सहज पूर्ण केल्या.
श्रीलंकेने इंग्लंडला घरात हरवलं
What a fantastic victory to end the series! Sri Lanka beat England by 8 wickets in the 3rd Test.
Congratulations to the team on a brilliant performance!
👏 #ENGvSL 🏏 pic.twitter.com/VZk1HUyWWb
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 9, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.