ENG vs WI 1st Test: इंग्लंडचा डाव आणि 114 धावांनी दणदणीत विजय, जेम्स अँडरसनला शानदार निरोप
England vs West Indies 1st Test Match Result: इंग्लंडने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवलाय. तसेच इंग्लंडने यासह जेम्स अँडरसन याला विजयी निरोप दिला आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमने कॅप्टन बेन स्टोक्सच्या नेतृत्वात विंडिज विरुद्ध कसोटी मालिकेत शानदार सुरुवात केली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 114 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने यासह विजयी सलामी दिली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच इंग्लंड टीमने दिग्गज जेम्स एंडरसन याला विजयासह निरोप दिला आहे. जेम्स अँडरसनने हा त्याचा अखेरचा कसोटी सामना असेल, हे आधीच जाहीर केलं होतं.
सामन्याचा झटपट आढावा
इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय करत विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडच्या धारदार बॉलिंगसमोर विंडिजचा डाव अवघ्या 121 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 371 धावा करत 250 धावांची भक्कम आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात विंडिजला दुसऱ्या डावात 136 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने अशाप्रकारे तिसऱ्याच दिवशी 114 धावा आणि डावाने विजय मिळवला.
गस ऍटकिन्सनचा पदार्पणात धमाका
गस ऍटकिन्सन या युवा गोलंदाजाने आपल्या पदार्पणात ऐतिहासिक कामगिरी केली. गसने विंडिज विरूद्धच्या या सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. गसने पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत विंडिजचे 12 वाजवले. गसने अशाप्रकारे आपल्या पदार्पणात अविस्मरणीय कामगिरी करत इंग्लंडच्या विजयात मोठं योगदान दिलं. तसेच जेम्स अँडरसन याने आपल्या अखेरच्या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. जेम्सने पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या.
जेम्स अँडरसन याला विजयी निरोप
A fitting end to an extraordinary career 🌟
James Anderson ends up with a career haul of 704 wickets as England take a 1-0 lead in the two-match Test series.#WTC25 | #ENGvWI 📝: https://t.co/WxFa3tTYfo pic.twitter.com/jz68gKYcPU
— ICC (@ICC) July 12, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.