इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्ध निरोपाचा सामना खेळत आहे. यानंतर जेम्स अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दिला पू्र्णविराम लागणार आहे. जेम्स अँडरसन जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेटचा पल्ला गाठला आहे. 41 वर्षीय जेम्स अँडरसन आपल्या क्रिकेट कारकिर्दित 188 कसोटी सामने खेळला आहे. आता शेवटचा कसोटी सामना सुरु असून त्याने तीन गडी बाद केले आहेत. त्यामुळे हा आकडा आता 703 झाला आहे. त्याचबरोबर त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 40 हजाराहून अधिक चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. इतकंच काय तर एकाच मैदानात सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने लॉर्ड्सवर एकूण 122 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जेम्स अँडरसनने कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीने मोठं मोठ्या फलंदाजांना अडचणीत आणलं. जेम्स अँडरसनने कसोटीत एक हजाराहून अधिक धावा, 50 पेक्षा जास्त विकेट्स आणि 50 पेक्षा जास्त झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही स्थान मिळवलं आहे. जेम्स अँडरसनने 2003 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
दरम्यान इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 121 धावांवर बाद झाला. या डावात इंग्लंडकडून गस एटकिनसन याने 7 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स याने प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीची धार दिसली. त्याने पहिल्या सत्रात 2 गडी बाद केले. तर गस एटकिन्सने एक तर बेन स्टोक्सने 2 गडी बाद केले. वेस्ट इंडिजची स्थिती पाहता इंग्लंड विजयाच्या वेशीवर आहे. निम्मा संघ तंबूत परतला असून अजून 150 हून अधिक धावांची आघाडी आहे.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाइल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, जयडेन सील्स.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.