ENG vs AUS | चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 41 वर्षाच्या तरूण खेळडूचं परत एकदा कमबॅक
हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांच्या झुंजार खेळीने संघाला विजय मिळवून देत मालिकेमधील आपलं आव्हान कायम ठेवलं होतं. मात्र चौथा सामनाही इंग्लंडसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.
मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील अॅशेसमध्ये रंगत आलेली आहे. पहिले तिन्ही सामने रोमहर्षक झाले. पाच सामन्यांच्या मालिकेमधील तीन सामने झाले त्यामध्ये 2-1 ने ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडने दिलेल्या चिवट झुंजीच्या जोरावर सामना जिंकत त्यांनी मालिकेत हातात ठेवली. मात्र चौथा सामनाही इंग्लंडसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.
मालिकेतील चौथा सामना 19 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. तिसऱ्या कसोटीत दुखापत झालेल्या ऑली रॉबिन्सनचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच स्टार खेळाडू जेम्स अँडरसनलाही संघात पुन्हा स्थान मिळालं आहे.
अॅशेसच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनचा फॉर्म खराब होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीमधून बाहेर बसवण्यात आलं होतं. मात्र कर्णधार बेन स्टोक्सने महत्त्वाच्या सामन्यात त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अँडरसनचं होम ग्राऊंड असलेल्या मैदानावर हा सामना होणार असल्याने नक्कीच फायदा होईल.
पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंड संघ 1-2 ने मागे आहे. हेडिंग्लेमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये त्यांनी जिंकून मालिकेमध्ये कमबॅक केलं होतं. हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांच्या झुंजार खेळीने संघाला विजय मिळवून देत मालिकेमधील आपलं आव्हान कायम ठेवलं होतं. आता चौथ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवणं गरजेचं आहे, हा सामना गमावला तर इंग्लंड ही अॅशेस हरू शकते.
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: बेन स्टोक्स (सी), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वुड