मुंबई | टीम इंडियाचं तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालं. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात कांगारुंनी टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये अपयशी ठरली. वर्ल्ड कप फायनल होऊन अनेक दिवस लोटले. मात्र अजूनही भारतीय क्रिेकेट चाहते आणि टीम इंडिया या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मात्र त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा टी 20 मालिकेत 4-1 ने धुव्वा उडवला. मालिका विजयासह वर्ल्ड कप पराभवाच्या जखमेवर मलम लावण्याचं काम केलं. मात्र त्यानंतरही चाहते हा पराभव विसरु शकत नाहीयत. अशातच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.
नववर्षात अर्थात जानेवारी 2024 मध्ये आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. हा 15 वा अंडर 19 वर्ल्ड कप असणार आहे. या स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचं यजमानपद हे आधी श्रीलंककडे होतं. मात्र त्यानंतर आता हे यजमानपद दक्षिण आफ्रिकेला देण्यात येणार आहे. अशात आयसीसीने सोशल मीडियाद्वारे मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने या आगामी अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशस मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंड क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बेन मॅककिनी हा इंग्लंडचा कर्णधार असणार आहे. तसेच अन्य युवा खेळाडूंनाही या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. ही अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 सुरुवात ही 13 जानेवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण किती संघ असणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गतविजेत्या टीम इंडियासह एकूण 16 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. टीम इंडिया, आयर्लंड, अमेरिका, बांगलादेशइंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडिज, स्कॉटलँड, श्रीलंका, झिंबाब्वे, नामिबिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, पाकिस्तान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड हे 16 संघ अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
अंडर 19 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन मॅककिन्नी (कर्णधार), ल्यूक बेंकनस्टीन (उपकर्णधार), फरहान अहमद, ताझीम अली, चार्ली अॅलिसन, चार्ली बर्नार्ड, जॅक कार्ने, जेडन डेन्ली, एडी जॅक, डॉमिनिक केली, सेबॅस्टियन, हेडन मस्टर्ड, हमजा शेख, नोआ थान आणि थिओ वायली.