T20I World Cup 2024 : वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, घातक बॉलरचं पुनरागमन
England Squad For T20I World Cup 2024 : गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. पाहा कुणाला संधी मिळाली?
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमनंतर आता अवघ्या काही मिनिटांनी गतविजेत्या इंग्लंडने टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम जाहीर केली आहे. इंग्लंडच्या मुख्य संघात नियमानुसार एकूण 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. जॉस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर अनेक महिने दुखापतीशी झुंज दिल्यानंतर इंग्लंडचा स्टार बॉलर जोफ्रा आर्चर याचं पुनरागमन झालं आहे. जोफ्राला परतल्याने इंग्लंडची ताकद वाढली आहे. जोफ्राने अखेरचा सामना हा मे 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला. आता जवळपास वर्षभराने निर्णायक क्षणी त्याचं कमबॅक झालं आहे. जोफ्रा आर्चर याच्यासह ख्रिस जॉर्डन याचंही पुनरागमन झालंय. जॉर्डनला ख्रिस वोक्सच्या जागी घेण्यात आलं आहे. जॉर्डननने अखेरचा सामना हा सप्टेंबर 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून जॉर्डन टी 20 टीमपासून दूर होता.
टॉम हार्टली यालाही संघात स्थान मिळालं आहे. हार्टलीने भारतात टीम इंडिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. हार्टलीने या तसोटी मालिकेत 22 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तर दुसऱ्या बाजूला ख्रिस वोक्स याला संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ख्रिस वोक्स हा 2019 च्या वनडे आणि 2022 सालच्या टी 20 वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग होता.
इंग्लंडच्या सामन्यांचं वेळापत्रक
वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण 20 सहभागी संघांना 5-5 नुसार 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार इंग्लंड टीम बी ग्रुपमध्ये आहे. इंग्लंडसह या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान या संघांचा समावेश आहे. इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 4 जून रोजी बारबाडोस येथे स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे.
इंग्लंड यशस्वी संघ
इंग्लंड टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक आहे. इंग्लंडने एकूण 2 वेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामिगिरी केली आहे. इंग्लंडने 2022 आणि 2010 साली वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्हीच संघांनी सर्वाधिक 2-2 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.
इंग्लंडचा वर्ल्ड कपसाठी संघ
Our ICC Men’s T20 World Cup squad looking 🔥🔥🔥
Who are you most looking forward to seeing? 👇#EnglandCricket | @T20WorldCup pic.twitter.com/48Q6pO2CzE
— England Cricket (@englandcricket) April 30, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.