Cricket : स्टार बॉलर उर्वरित वर्षभरासाठी आऊट, टीमला मोठा झटका
Cricket: स्टार बॉलरला दुखापतीमुळे 2024 या वर्षातील उर्वरित दिवसांमध्ये क्रिकेट खेळता येणार नाही. त्यामुळे टीमला मोठा झटका लागला आहे.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट टीमचा स्टार बॉलर मार्क वूड हा 2024 या वर्षातील उर्वरित महिन्यातही क्रिकेट खेळू शकणार नाही. मार्क वूडला दुखापतीमुळे हा फटका बसला आहे. मार्क वूड बाहेर झाल्याने इंग्लंडलाही हा मोठा झटका आहे. इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. मार्क वूड याला या मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे वूडला मालिकेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता वूडला 2024 या वर्षातील उर्वरित महिन्यातही क्रिकेटला मुकावं लागलं आहे. इंग्लड क्रिकेट टीमने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
मार्क वूडला दुखापत महागात पडली
मार्क वूडला यामुळे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार वूडला विंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेत कोपऱ्याला त्रास जाणवत होता. त्यानंतर वूडला श्रीलंके विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मांडीला दुखापत झाली. त्यानंतर स्कॅनिंग करण्यात आलं. स्कॅनिंगमधून दोन्ही दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. वूडच्या दुखापतीमुळे इंग्लंडला झटका लागलाय.
मार्क वूडवर वैद्यकीय पथक बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच वूड दुखापतीतून बरा होण्यासाठी शक्य ते उपचार घेतोय, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. तर दुसऱ्या बाजूला वूडने त्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “रुटीन चेकअपदरम्यान या दुखापतीचा उलगडा झाला. मला दुखापत असल्याचं समजल्यानंतर मी हैराण आहे”, असं वूडने म्हटलंय.
मार्क वूड आता 2025 मध्ये मैदानात उतरणार
Gutting news 💔
Mark Wood has been ruled out for the rest of the year following a right elbow injury.
Back stronger, Woody 💪
— England Cricket (@englandcricket) September 6, 2024
वूडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दरम्यान 34 वर्षीय मार्क वूड याने इंग्लंडचं 37 कसोटी, 66 एकदिवसीय आणि 34 टी20i सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. वूडने कसोटीत 119, वनडेमध्ये 77 आणि टी 20i क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वूडने टेस्टमध्ये 807, वनडेत 43 आणि टी20i क्रिकेटमध्ये 5 धावा केल्या आहेत.