आयपीएल 2025 स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच मे महिन्याच्या शेवटी स्पर्धा संपेल. एकूण 74 सामने असतील यात काही शंका नाही. कारण मागच्या शेड्युलमध्ये काहीच बदल केलेला नाही. त्यामुळे फ्रेंचायझींनी आतापासून कंबर कसली आहे. स्पर्धा मार्चमध्ये सुरु होईल असं गृहीत धरलं तर संघ बांधणीसाठी फ्रेंचायझींकडे तीन महिन्यांचा अवधी राहील. कारण नोव्हेंबर 24 आणि 25 रोजी मेगा लिलाव पार पडेल. त्यानंतर कर्णधार आणि संघाची एकत्रितपणे विचार केला जाईल. यासाठी काही काळ आवश्यक आहे. तीन महिन्यात खेळाडूंनी एकमेकांशी जुळवून घेत मैदानात उतरणं अपेक्षित आहे. त्यामुळे फ्रेंचायझी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तसेच उरलेल्या पैशातून मेगा लिलावात उतरणार आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार आणि विकेटकीपर-बॅट्समन ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. तर अक्षर पटेलला 16.5 कोटी, कुलदीप यादवला 13.25 कोटी, ट्रिस्टन स्टब्सला 10 आणि अभिषेक पोरेलला 4 कोटी देऊन संघात ठेवलं आहे. पण आता मेगा लिलावात उतरण्यापूर्वी 1574 खेळाडूंच्या यादीत रिटेन केलेल्या ट्रिस्टन स्टब्सचं नाव ऐकून धक्का बसला आहे. रिटेन करूनही ट्रिस्टन स्टब्सने मेगा लिलावासाठी नाव का दिलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं नाव चुकून आलं असावं असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. याबाबत ट्रिस्टन स्टब्सने कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार यात काहीच शंका नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. दिल्ली कॅपिटल्स अजून एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली टीम बांधून जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रयत्न असेल.
ट्रिस्टन स्टब्स 2022 पासून आयपीएल खेळत आहे. मुंबई इंडियन्सने त्याला घेतलं होतं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा भाग झाला. आयपीएल 2024 मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 18 आयपीएल सामन्यात त्याने 405 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 4 विकेटही नावावर आहेत.