मुंबई : टीम इंडियाचा कर्णधारपदावर बीसीसीआयने बदल करून पाहिला पण यश काही आलं नाही. विराट कोहली याच्याकडे कर्णधारपद असताना भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यानंतर विराट कोहली याच्याकडून हे कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे देण्यात आलं. त्यानंतर रोहित तिन्ही संघाचा कर्णधार झाला पण त्यालाही विशेष काही छाप सोडता आली नाही.
रोहितकडे आता वन डे वर्ल्ड कप 2023 जिंकण्याची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार हा निश्चितपणे बदलणार यात काही शंका नाही. अशातच यावर माजी कोच रवी शास्त्री यांनी नव्या कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणत्या खेळाडूकडे सोपवायची. याबाबत बोलताना, रवी शास्त्री यांनी कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याकडे जबाबदारी सोपवावी असं म्हटलं आहे. 2022 च्या T-20 वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या T20 संघाचा कर्णधार आहे.
खरं सांगायचं झालं तर हार्दिक पांड्याचा आताचा फिटनेस पाहता तो कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्याकडे संघाचं कर्णधारपद देण्यात यावं, असं रवी शास्त्री म्हणाले.
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने त्यांच्या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकड सोपवलं होतं. हार्दिक पांड्याने आपल्या संघाला पहिल्याच सामन्यात चॅम्पियन बनवण्यात यश मिळवलं. आयपीएलच्या या मोसमातही हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली गुजरात संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. सीएसकेविरूद्ध निसटता पराभव झालेला, त्यामुळे क्रिकेट चाहते त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहतात.
दरम्यान, हार्दिकने दुखापतीनंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे. बॅटींगला आला की फक्त मोठे फटके न खेळता संघाला जशा गरज असेल तशा पद्धतीने तो आता बॅटींग करत आहे. त्यामुळे हार्दिक कर्णधार म्हणून परिपक्व होत असल्याचं दिसत आहे.