WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगचं दुसरं पर्व या तारखेपासून सुरु होणार! बीसीसीआय लवकरच करणार घोषणा
वुमन्स लीग २०२४ पर्वासाठी मिनी लिलाव नुकताच पार पडला. या लिलावत दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. त्यानंतर अन्नाबेल सुथरलँड हिच्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर दिल्लीने बाजी मारली. आता वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक समोर आलं आहे. बीसीसीआय लवकरच याची घोषणा करणार आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दुसऱ्या पर्वाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पाच संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. पण वुमन्स प्रीमियर लीगचे सामने होणार तरी कधी असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला होता. आता बीसीसीआयच्या गोटातून खात्रीलायक माहिती समोर आहेली आहे. वुमन्स प्रीमियर लीगसाठी २२ फेब्रुवारी ते १७ मार्च हा कालावधी जवळपास निश्चित करण्यात आला आहे. बीसीसीआय लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करेल. पहिल्या पर्वात वुमन्स प्रीमियर लीगचे सर्व सामने मुंबईत आयोजित केले होते. मात्र या सीझनसाठी दोन ठिकाणांची निवड केली आहे. वुमन्स प्रीमियर लीगचे सामने मुंबई आणि बंगळुरुत होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तात्पुरते वेळापत्रक पाच फ्रेंचाईसींना कळवले आहे.
गुजरात जायंट्सची मेंटॉर मिताली राजने सांगितलं की, स्पर्धा एकाच ठिकाणी खेळवण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्याकडे प्राधान्य असेल. पण याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जय शाह यांनी क्रिकबजशी याबाबत सांगितलं की, “फेब्रुवारीमध्ये स्पर्धा होईल हे निश्चित आहे. पण कोणत्या ठिकाणी सामने होतील याबाबत खलबतं सुरु आहेत. एकाच राज्यात करण्यावर जोर असेल कारण रसद पोहोचवणं सोपं होईल. स्पर्धा दोन ठिकाणी आयोजित केले जातील पण एकाच राज्यात असेल.”
“बंगळुरू आणि उत्तर प्रदेशही चांगली ठिकाणं आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद, राजकोट आणि बडोदा आहे. पण याबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. पण ही स्पर्धा एकाच राज्यात असेल यात काही शंका नाही”, असंही जय शाह पुढे म्हणाले
दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ या स्पर्धेत आहेत. डब्ल्यूपीएलच्या मागच्या पर्वात एकूण २२ सामने झाले होते. पाच संघांनी प्रत्येकी ८ सामने खेळले होते. यातून टॉपला असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात अंतिम फेरी झाली होती. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारून पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं.