Champions Trophy 2025: भारतीय संघाची घोषणा करण्यास इतका विलबं का? नवजोत सिंह यांचा बीसीसीआयवर निशाणा
Navjot Singh Sidhu on CT 2025 Team India Squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने अद्याप भारतीय संघ जाहीर केलेला नाही. यावरुन माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पाकिस्तान आणि टीम इंडिया या 2 संघांचा अपवाद वगळता इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 6 संघांनी टीम जाहीर केली आहे. मात्र अद्याप बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी निवड समिती इतका वेळ का घेत आहे? निवड समितीला 15 खेळाडू निश्चित करता येत नाहीयत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यात आता माजी भारतीय क्रिकेटपटू नवजaत सिंह सिद्धू यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
नवजोत सिंह सिद्धू यांनी टीम जाहीर न केल्याने चिंता व्यक्त केली आहे. “आयसीसीच्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यात विलंब केला आहे. या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची 12 जानेवारी ही ही शेवटची मुदत होती. ही मुदत संपली आहे. आता निवड समिती आणि खेळाडूंची अस्वस्थता वाढली आहे. केव्हा घोषणा होतेय याची प्रतिक्षा केली जात आहे”, असं सिद्धू यांनी म्हटलं.
बुमराहबाबत काय म्हणाले?
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात सिडनीत दुखापत झाली. बुमराहला या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागण्याची शक्यता आहे. बुमराहच्या दुखापतीने निवड समिती, टीम इंडिया आणि चाहत्यांचं टेन्शन वाढवलं आहे. बुमराहकडे साऱ्यांच लक्ष असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. बुमराहचं नाव हे भारतीय क्रिकेट कोणत्या स्तरावर आहे हे दर्शवतं. तसेच बुमराहच्या प्रतिभेचं जगभर सन्मान केलं जातं, असं माजी क्रिकेटरने नमूद केलं.
माजी क्रिकेटपटूची पोस्ट, बुमराहबाबत चिंता व्यक्त
“25 years of ICC history — India’s Champions Trophy squad announcement delayed for the first time ever. The January 12 deadline passed, the selectors & teammates wait with bated breath, 1.5 billion hearts pray and hope for the best, all eyes on Jasprit Bumrah. His name alone… pic.twitter.com/WQn5P7kxeN
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) January 15, 2025
दुखापतीवर काय म्हणाले?
सिद्धू यांनी बुमराहच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली.”बुमराहच्या दुखापतीचं रहस्य अजून उलगडलेलं नाही. तसेच बुमराहची दुखापत हा मुद्दा संघाची घोषणा करण्यापर्यंत मर्यादित नसून साऱ्या देशाच्या आशेचा प्रश्न आहे”, असं सिद्धू यांनी नमूद केलं.