‘त्या’ प्रकरणात अखेर माजी क्रिकेटपटूला अटक, न्यायालयात हजर केल्यानंतर नेमकं काय झालं? जाणून घ्या
नागपूरमध्ये एका माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासोबत क्रिकेट खेळला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे.
मुंबई : नागपूरमध्ये वनडे सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत खेळला आहे. चेक बाउन्स प्रकरणात प्रशांत वैद्यला अटक करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आपली चक्र हलवत त्याला अटक केली. अटकेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 90 च्या दशकात भारतीय संघाकडून प्रशांत वैद्य चार सामने खेळला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे. वैद्य सध्या विदर्भ क्रिकेट संघाच्या क्रिकेट विकास समितीचे प्रमुख आहेत.
बजाज नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी सांगितलं की, ‘एका स्थानिक व्यापाऱ्याकडून स्टील खरेदी केलं होतं. त्यासाठी एक चेक दिला होता. मात्र तो चेक बाउंस झाला. त्यानंतर व्यापाऱ्याने पैशांची मागणी केली. पण माजी क्रिकेटपटूने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर व्यापाऱ्याने थेट न्यायालयाचं दार ठोठावलं. न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी न झाल्याने कोर्टाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं.’
प्रशांत वैद्य याने 22 फेब्रुवारी 1995 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वनडेमध्ये पदार्पण केलं होतं.तर शेवटचा वनडे सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 14 एप्रिल 1996 ला खेळला आहे. यात चार सामन्यातील दोन डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यात एकूण 15 धावा केल्या. तर चार सामन्यात 174 धावा देत 4 गडी बाद केले होते. प्रशांत वैद्य आतापर्यंत खेळलेले चारही सामने परदेशात खेळला आहे. 1995 मध्ये आशिया कप विजेत्या संघात प्रशांत वैद्य होता. 54 वर्षीय प्रशांत वैद्य देशांर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ आणि बंगालकडून खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1000 धावा आणि 170 विकेट्स आहेत.