IND vs WI 3rd T20 : “राहुल द्रविड याच्याकडून पंड्याला हवं तसं सहकार्य नाही”; क्रिकेट विश्वात खळबळ!
IND vs Wi T2o : टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत असलेल्या हार्दिक पंड्यावर आजी-माजी खेळाडू टीका करत आहेत. पंड्याने काही चुकीचे निर्णय घेतले हे दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये दिसून आलं.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील टी-20 मालिकेमध्ये आता कॅरेबियन संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत असलेल्या हार्दिक पंड्यावर आजी-माजी खेळाडू टीका करत आहेत. पंड्याने काही चुकीचे निर्णय घेतले हे दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये दिसून आलं. अक्षर पटेल याला एकही ओव्हर टाकायला दिली नाही. सामन्यातील 19 वी ओव्हर मुकेश कुमार याला दिल्यानेही त्याच्यावर टीका होत आहे. मात्र अशातच एका माजी खेळाडूने मुख्य कोच राहुल द्रविड आणि पंड्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
हार्दिक पंड्याने आयपीलमध्ये गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपदाची धुरा सांभाळताना प्रभावी कामगिरी केलीये. गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच मोसमात विजेतेपादावर नाव कोरलं होतं. नेहरा-पंड्या ही कॅप्टन कोच जोडगोळी दमदार कामगिरी करत आहे. गुजरातकडून कोच म्हणून नेहराने पंड्याला प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे पंड्याला प्रोत्साहित करेल अशी व्यक्ती पंड्यासोबत हवी आहे. राहुल द्रविडकडून पंड्याला जसं हवं तसं प्रोत्साहन मिळत नसल्याचं माजी खेळाडू पार्थिव पटेल याने म्हटलं आहे.
पार्थिव पटेल याने हार्दिक पंड्यावरही निशाणा साधताना चहलबाबतची चूक बोलून दाखवली. ज्या खेळाडूने तुम्हाला सामना पालटून दिला त्या बॉलरच्या 4 ओव्हर पूर्ण करणं गरजेचं आहे. या एका निर्णयामुळे मला वाटतं की दुसरा टी-20 सामना वेस्ट इंडिजच्या पारड्यात गेला, असं पार्थिव पटेल म्हणाला.
दरम्यान, आज मंगळवारी तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. त्यामध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. नाहीतर पंड्या आणि अँड कंपनीवर मालिका गमावण्याचं संकट आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सांघिक कामगिरी करणं गरजेचं आहे.