न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात चार राखीव खेळाडूंचा समावेश, कोण आणि कशासाठी ते जाणून घ्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीतील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहेत. तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यासाठी 15 खेळाडूंचा चमू जाहीर केला आहे. मात्र चार राखीव खेळाडू भारताच्या दिमतीला असणार आहे. असं का ते जाणून घ्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळलेला 15 सदस्यीय संघ मैदानात उतरणार आहे. असं असताना चार राखीव खेळाडूंची घोषणा केली आहे. या राखीव खेळाडूंच्या माध्यमातून बीसीसीआय पुढचं गणित सोडवू इच्छित असल्याचं दिसत आहे. भारताला काहीही करून न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कस लागणार आहे. असं असताना चार राखीव खेळाडू टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोणताही खेळाडू जखमी झाला तर राखीव खेळाडूंच्या यादीतून निवड केली आहे. या राखीव खेळाडूंच्या यादीत तीन वेगवान गोलंदज आणि एक अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
मयांक यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी यांची राखीव खेळाडू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मयांक यादव, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाज आहेत. तर नितीश रेड्डी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकतंच बांगलादेशविरुद्ध त्याने आपल्या खेळीने छाप पाडली होती. विशेष म्हणजे अष्टपैलू नितीश रेड्डी हाही वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने वेगवान गोलंदाजांवर भर दिल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी या वेगवान गोलंदाजांचं नाव राखीव खेळाडूंच्या यादीत आहे.सध्या भारतीय संघात मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप हे वेगवान गोलंदाज आहेत.
दरम्यान, उपकर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह ही धुरा सांभाळू शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये 24 ऑक्टोबरपासून दुसरा सामना, तर तिसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.