आयपीएल लिलावापूर्वी या खेळाडूंचं होणार ऑडिशन, फ्रेंचायझींचं लक्ष वेधून घेण्याची शेवटची संधी

| Updated on: Nov 07, 2024 | 4:29 PM

आयपीएल मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या मेगा लिलावात 1574 खेळाडूंच्या नशिबाचा फैसला होणार आहे. कारण यापैकी फक्त 204 खेळाडूंची निवड होणार आहे. असं असताना टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची शेवटची संधी आहे.

आयपीएल लिलावापूर्वी या खेळाडूंचं होणार ऑडिशन, फ्रेंचायझींचं लक्ष वेधून घेण्याची शेवटची संधी
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी पहिल्यांदा रिटेन्शन यादी समोर आली आहे. त्यामुळे इतर खेळाडूंचा फैसला हा मेगा लिलावात होणार आहे. प्रत्येक संघाला संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे मेगा लिलावात जबरदस्त तडजोड होताना दिसणार आहे. कारण बऱ्याचशा फ्रेंचायझींना खेळाडूंना रिलीज रिलीज करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तर काही खेळाडूंचं फ्रेंचायझींसोबत बिनसल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे 24 आणि 25 नोव्हेंबरला दिग्गज खेळाडूंचा फैसला सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये होणार आहे. यासाठी फ्रेंचायझींनी कंबरही कसली आहे. असं असताना टीम इंडियाच्या काही खेळाडूंकडे स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण या लिलावापूर्वी दक्षिण अफ्रिकेत 4 सामन्याची टी20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेतून फ्रेंचायझींना खेळाडूंचा फॉर्म चाचपडता येणार आहे. साध्या भाषेत सांगायचं तर खेळाडूंचं ऑडिशन असणार आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला लिलावात मोठा भाव मिळू शकतो.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात काही खेळाडूंना रिटेन केलेलं आहे. तर काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे रिलीज केलेल्या खेळाडूंवर डाव लागणार आहे. यात जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, आवेश खान, विजयकुमार विशाक या खेळाडूंकडे लिलावापूर्वी एक मोठी संधी आहे. इतर खेळाडूंना रिटेन केलं गेलं आहे. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंह, वरुण चक्रवर्थी, रवि बिश्नोई, यश दयाल या खेळाडूंना रिटेन केलं आहे. त्यामुळे टीम इंडियात असलेल्या चार खेळाडूंकडे संधी आहे. पण त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं गरजेचं आहे.

जितेश शर्माला पंजाब किंग्सने रिलीज केलं आहे. विकेटकीपर बॅट्समन असल्याने त्याच्यावर नजरा असतील. पण संजू सॅमसन असताना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण आहे. पंजाबने अर्शदीप सिंगलाही रिलीज केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे मोठी संधी आहे. या मालिकेत चमकला तर त्याला लिलावात चांगला भाव मिळेल. आवेश खानलाही राजस्थान रॉयल्सने रिलीज केलं असून त्याच्याकडेही संधी आहे. विजयकुमार विशाकला आरसीबीने रिटेन केलं नाही. त्यामुळे त्यालाही संधी मिळाली तर सिद्ध करून दाखवता येईल.