टीम इंडियापेक्षा गौतम गंभीरची प्रशिक्षकपदासाठी करो या मरोची लढाई, तसं झालं तर थेट…
सि़डनी कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची वाताहत झाली आहे. रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे आराम करण्याचा निर्णय घेतला तरी काही सुधारणा नाही. फलंदाजांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. पहिल्या दिवसापासून टीम इंडिया पिछाडीवर दिसत आहे. तर गौतम गंभीरची उलटी गणना सुरु झाली आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अपेक्षित कामगिरी टीम इंडिया करेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. टीम इंडिया 185 धावांवरच तंबूत परतली. ऋषभ पंतने त्यातल्या त्यात 40 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. नितीश कुमार रेड्डीला खातंही खोलता आलं नाही. बोलँडने 4, स्टार्कने 3, कमिन्सने 2 आणि लियॉनने 1 गडी बाद केला. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवली आहे. हा कसोटी सामना गमावल्यानंतर गौतम गंभीरच्या पदही धोक्यात येणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, गौतम गभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हेड कोच पदावरून दूर केलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण संघाची धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे. गौतम गंभीरची कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून गच्छंती केली जाईल असं सांगण्यात येत आहे.
गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोच पदी विराजमान झाल्यापासून काही तरी बिनसल्याचं दिसत आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडियाला उतरती कला लागली आहे. पहिल्यांदा श्रीलंकेत वनडे सीरिज, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने कसोटी, आता बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका हातून गमवण्याची वेळ आली आहे. रिपोर्टनुसार, गंभीर आणि रोहित यांच्यात हवं तसं संभाषण होत नसल्याचीही देखील चर्चा आहे. दोघांनी विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने टीम इंडियाचं नुकसान होत असल्याचं सांगण्यात येत आहे. गौतम गंभीरचं प्रशिक्षण टीम इंडियाच्या खेळाडूंना भावलं नसल्याचं दिसत आहे. त्याचा परिणाम मैदानात दिसून येत आहे.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठेल की नाही याबाबत अजून जर तरच गणित आहे. सिडनी कसोटी गमावली तर थेट जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाईल. अशा स्थितीत कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर दिली जाईल, असं सांगण्यात येत आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सध्य नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. छोट्या मालिकांमध्ये टीम इंडियासोबत हेड कोच म्हणून जातो. पण आता मोठी जबाबदारी मिळू शकते.