Video : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी गौतम गंभीर झाला भावूक, खास व्यक्तीने पाठवलेला मेसेज ऐकला आणि…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीलंका दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात पहिलाच दौरा आहे. या मालिकेतील पहिला सामना होत आहे. तत्पूर्वी एक व्हॉईस मेसेज ऐकून गौतम गंभीर भावूक झाला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या नेतृत्वातील पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काय होते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. राहुल द्रविडने निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा गौतम गंभीरने घेतली आहे. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आणि पायउतार झाला. आता राहुल द्रविडने या पदावर बसलेल्या गौतम गंभीरसाठी एक खास मेसेज पाठवला आहे. द्रविडने गंभीरला भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. या मेसेजनंतर गौतम गंभीर खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. यात राहुल द्रविडने एक व्हॉईस रेकॉर्डिंग पाठवलं आहे. बीसीसीआयने लॅपटॉप समोर ठेवला होता आणि गौतम गंभीरने स्पेस बार दाबताच राहुल द्रविडचा मेसेज त्याच्या कानावर पडला.
राहुल द्रविडने सांगितलं की, “हॅलो गौतम, मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय संघासोबत माझा कार्यकाळ संपून आता तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. ज्या पद्धतीने मी पहिला बारबाडोस आणि मुंबईत आपला कोचिंग कार्यकाळ संपवला. त्याबाबत मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझी इच्छा आहे की माझ्यापेक्षा चांगले रिझल्ट तुला मिळो. मी यासाठी प्रार्थना करतो. तुला कायम फिट खेळाडू मिळो आणि नशिबाची साथ मिळो. कारण याची खूप गरज आहे. जेव्हा आपण एकत्र खेळत होतो. तेव्हा मी फलंदाजीत तुझी चमक पाहिली आहे. तेव्हा तू सर्वस्वी देत होता. तू विरोधकांसमोर हार पत्कारत नाही आणि मी हे तेव्हाही नोटीस केलं होतं. ”
“इकडे तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. वाईटातील वाईट काळातही तू एकटा नसशील. तुला प्लेयर्स, सपोर्ट स्टाफ, मॅनेजमेंट आणि मागच्या लीडर्सची साथ मिळेल. एका प्रशिक्षकाकडून दुसऱ्या प्रशिक्षकाला एकच संदेश आहे की वाईटातील वाईट काळात चेहऱ्यावर हास्य ठेव. मला विश्वास आहे की तू भारतीय क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवशील.”, असं राहुल द्रविड पुढे म्हणाला.
𝗣𝗮𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗼𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝘁𝗼𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝗰𝗹𝗮𝘀𝘀 & 𝗴𝗿𝗮𝗰𝗲! 📝
To, Gautam Gambhir ✉
From, Rahul Dravid 🔊#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/k33X5GKHm0
— BCCI (@BCCI) July 27, 2024
द्रविडने पाठलेल्या या व्हॉईस रेकॉर्डिंगनंतर गौतम गंभीर भावूक झाल्याचं दिसून आलं. त्याने सांगितलं की, ‘हा मेसेज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा मेसेज अशा व्यक्तीकडून आला आहे, जेव्हा खेळायचा तेव्हा त्याच्याकडे पाहून बरंच काही शिकलो. मला वाटतं द्रविडकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. माझ्यासाठीच नाही तर येणाऱ्या आणि सध्याच्या पिढीसाठीही आहे. मी जास्त भावूक होत नाही. पण मला वाटत की या संदेशामुळे मी भावूक झालो आहे. ‘