BGT 2024 : गौतम गंभीरला पद वाचवण्यासाठी शेवटची संधी! जर तसं झालं नाही तर…
भारताची न्यूझीलंडविरुद्धची निराशाजनक कामगिरी पाहता क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी आहे. न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच काय तर आगामी बॉर्डर गावस्कर मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
न्यूझीलंडने घरच्या मैदानात 3-0 ने मात दिल्यानंतर टीम इंडिया आणि बीसीसीआयची क्रीडाविश्वात नाचक्की झाली आहे. सर्व काही अनुकूल असताना असा पराभव पचनी पडणारा नाही. त्यामुळे बीसीसीआयला खडबडून जाग आली आहे. बीसीसीआयने गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉर्डर गावस्कर मालिकेत खऱ्या अर्थाने गौतम गंभीरची कसोटी लागणार आहे. या कसोटीत गौतम गंभीरचं प्रशिक्षकपद फेल गेलं तर मात्र त्याची उचलबांगडी केली जाऊ शकते. मिडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला तर भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्याचा विचार करत आहे. तसेच बीसीसीआय कसोटी आणि वनडे/टी20 संघांसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमण्याचा विचार करत आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्यास गौतम गंभीरला कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच, त्याला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत एकदिवसीय प्रशिक्षक म्हणून कायम ठेवलं जाईल.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ पाच सामने खेळणार आहेत. टीम इंडियाने मालिका 4-0 ने जिंकली तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील स्थान निश्चित होईल.
दरम्यान, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल यात शंका नाही. त्यामुळे भारतीय कसोटी संघाचे प्रशिक्षकपद कायम ठेवण्यासाठी गौतम गंभीरला ऑस्ट्रेलियात शानदार विजयाची गरज आहे.त्यामुळे आता सर्वस्वी टीम इंडियाच्या खेळाडूंवर या बाबतची जबाबदारी आहे. पण पहिल्या सामन्यात विघ्न येणार असं दिसत आहे. कारण कर्णधार रोहित शर्माला पहिल्या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच टीम इंडियावर दबाव असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक
- पहिली कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (22 ते 26 नोव्हेंबर) पर्थ स्टेडियम, पर्थ
- दुसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (6 ते 10 डिसेंबर) ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
- तिसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (14 ते 18 डिसेंबर) द गाबा, ब्रिस्बेन
- चौथी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (26 ते 30 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
- पाचवी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 ते 7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी