“गौतम गंभीर खेळलाही आणि खूप सारं सोसलंही”, बालपणीच्या प्रशिक्षकाने सांगितलं सर्व काही
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यानंतर त्याच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर येणाऱ्या आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाकडून चमकदार कामगिरी करून घेण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर याची नियुक्ती झाली आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर राहुल द्रविडला आनंदी निरोप मिळाला. तर गौतम गंभीरच्या खांद्यावर आता पुढची जबाबदारी असणार आहे. गौतम गंभीरकडून आता क्रीडारसिकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. साडे तीन वर्षांच्या कालावधीत मैलाचा दगड गाठायचा आहे. दरम्यान, प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असताना गौतम गंभीरचा बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी मन मोकळं केलं आहे. गौतम गंभीरने त्याच्या आयुष्यात फक्त खेळच खेळला नाही, तर बऱ्याच आव्हानांना देखील सामोरं गेला आहे. “त्याने खूप खेळलं आहे आणि खूप सारं सोसलंही आहे.”, असं संजय भारद्वाज म्हणाले. भारद्वाज यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्व गुणांवर प्रकाशझोत टाकला.
“खेळाडू म्हणून त्याने दोन विश्वचषक जिंकले आहेत. एक लीडर म्हणून तो भारताला आणखी विश्वचषकाच्या गौरवापर्यंत नेईल यात शंका नाही. एक खरा लीडर त्याच्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम गोष्टी घडवून आणतो”, असं भारद्वाज यांनी आयएएनएसला सांगितलं. “गौतम गंभीर खेळलाही आणि खूप सारं सोसलंही आहे. इतकं सारं सहन करणाऱ्या व्यक्तीने इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
“गंभीरने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हान सहन केली आहेत. जो आव्हानांचा सामना करतो त्याच्या कृतीत शंका नसते. त्याच्या अनुभवाचा आणि जीवनातील आव्हानांचा सामना पाहता तो भविष्यात उत्कृष्ट कामगिरी करेल यात शंका नाही.”, असंही भारद्वाज यांनी पुढे सांगितलं. खेळाडू असताना दोन वर्ल्डकप जिंकले आहेत. आता प्रशिक्षक असातना 2-3 वर्ल्डकप जिंकवून देईल, असंही त्यांनी कौतुक करताना सांगितलं.
“तरुण खेळाडूंना निसंकोचपणे खेळण्यासाठी फ्री हँड मिळेल. कोणत्याही खेळाडूवर दबाव टाकणार नाही. उमेश यादव, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांना त्यानेच आणलं. कारण त्याला त्यांच्यातील क्षमता माहिती होती. सुनील नरीनला ओपन करण्यास सांगणं मोठं आव्हान होतं. जर ही खेळी चुकली असती तर त्याच्यावर टीका झाली असती. पण तो जे काही करतो ते संघासाठी करतो. जे आव्हान तो स्वीकारतो ते तो पूर्ण करतो.”, असं भारद्वाज यांनी सांगितलं.