आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप आणि जेतेपदाचा 36 चा आकडा, जाणून घ्या आतापर्यंत काय झालं ते
आयपीएल स्पर्धेत गेल्या काही दिवसांपासून ऑरेंज कॅपची शर्यत एकतर्फी होताना दिसत आहे. रनमशिन्स म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहलीच्या डोक्यावर ही कॅप आहे. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत. पण आतापर्यंत ऑरेंज कॅपचा इतिहास पाहता ती न मिळाली तरच बरं होईल असं चाहते म्हणत आहे. त्याचं कारणंही तसंच आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत या आठवड्यात प्लेऑफचं सर्व काही चित्र स्पष्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमधलं स्थान निश्चित केलं आहे. तर राजस्थान रॉयल्सचा एक पाय प्लेऑफच्या रेषेत आहे. दोन पैकी एक सामना जिंकला की स्थान पक्कं होईल. तर उर्वरित दोन संघांसाठी जबरदस्त चुरस आहे. दोन स्थानासाठी पाच संघ शर्यतीत आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जुंपली आहे. आता सर्व गणित एकमेकांच्या जय पराजयावर अवलंबून आहे. असं सर्व गणित असताना एक विचित्र गणित चाहत्यांच्या डोक्यात घोंघावत आहे. खासकरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना एक वेगळीच चिंता सतावत आहे. गेल्या 16 पर्वात जेतेपदाची झोळी रिती राहिली आहे. यंदा तरी जेतेपद मिळेल का? अशी आस लावून बसले आहेत. त्यात प्लेऑफसाठी बरीच आकडेमोड करत आहे. असं असताना ऑरेंज कॅपच्या विचित्र योगामुळे चाहते अस्वस्थ झाले आहे. विराट कोहलीने 13 सामन्यात 661 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे.
आयपीएल इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणं विजयाची खात्री देत नाही. आतापर्यंतची आकडेवारी पाहून तुम्ही असंच म्हणाल. ऋतुराज आणि उथप्पाच्या बाबतीत हा अपवाद ठरला आहे. 2008 मध्ये पंजाब किंग्सचा शॉर्न मार्श ऑरेंज कॅपचा मानकरी, पण जेतेपद राजस्थान रॉयल्सला मिळालं. 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा मॅथ्यू हेडनला ऑरेंज कॅप आणि जेतेपद डेक्कन चार्जर्सला मिळालं. 2010 मध्ये मुंबई इंडियन्सच्या सचिन तेंडुलकरला ऑरेंज कॅप आणि जेतेपद चेन्नई सुपर किंग्सकडे, 2011 मध्ये आरसीबीच्या ख्रिस गेलला ऑरेंज कॅप आणि जेतपद चेन्नई सुपर किंग्सला मिळालं होतं.
2012 मध्ये आरसीबीच्या ख्रिस गेलला ऑरेंज कॅप आणि कोलकाता नाईट रायडर्स जेतेपदाचा मानकरी, 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या मायकल हसीला ऑरेंज कॅपचा आणि जेतेपदाचा मान मुंबई इंडियन्सला मिळाला होता. 2014 मध्ये अपवाद ठरला होता. ऑरेंज कॅप रॉबिन उथप्पा आणि जेतेपदही कोलकात्याला मिळालं होतं. 2015 मध्ये ऑरेंज कॅप सनरायझर्स हैदराबादच्या डेविड वॉर्नरला आणि जेतेपद मुंबई इंडियन्सला मिळालं होतं.
2016 मध्ये आरसीबीच्या विराट कोहलीला ऑरेंज कॅप आणि जेतेपद सनरायझर्स हैदराबादला, 2017 मध्ये हैदराबादच्या डेविड वॉर्नरला ऑरेंज कॅप आणि जेतेपद मुंबई इंडियन्सला, 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या केन विल्यमसनला ऑरेंज कॅप आणि जेतेपद चेन्नई सुपर किंग्सला, 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबाजच्या डेविड वॉर्नरला ऑरेंज कॅप आणि जेतेपद मुंबई इंडियन्सला, 2020 मध्ये पंजाब किंग्सच्या केएल राहुलला ऑरेंज कॅप आणि जेतेपद मुंबई इंडियन्सला मिळालं होतं.
2021 मध्ये ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपसाठी अपवाद ठरलेला दुसरा फलंदाज ठरला. ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप मिळवली आणि जेतेपद संघाला मिळालं होतं. 2022 मध्ये पुन्हा एकदा तसंच सुरु झालं. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने ऑरेंज कॅप मिळवली आणि जेतेपदावर नाव कोरलं ते गुजरात टायटन्सने. 2023 मध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. गुजरात टायटन्सच्या शुबमन गिलने ऑरेंज कॅप मिळवली पण जेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सने नाव कोरलं.