ग्लेन मॅक्सवेलला क्रँपमुळे झाला फायदा! वादळी खेळीचं सचिन तेंडुलकरने केलं असं विश्लेषण
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेला अफगाणिस्तानकडून जीवदान मिळाल्यानंतर गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. पण सरते शेवटी पायात क्रॅम्प आल्याने खेळणं कठीण झालं होतं. पण ते दुखणं मॅक्सवेलच्या कसं पथ्यावर पडलं याबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितलं आहे.
मुंबई : अफगाणिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला होता. 91 धावांवर 7 गडी तंबूत परतले होते. 292 धावांचं आव्हान असताना 3 खेळाडूंच्या जीवावार 200 धावा गाठणं तसं कठीण होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पराभूत होईल असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण ग्लेन मॅक्सवेलनं सर्व चित्रच पालटलं. नाबाद 201 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालं. मॅक्सवेलची ही खेळी पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहे. क्रॅम्प आणि पाठदुखीचा त्रास होऊनही त्याने मैदान सोडलं नाही आणि शेवटपर्यंत खिंड लढत राहिला. इतकंच काय तर संघाला एकहाती विजय मिळवून दिला. मॅक्सवेलच्या वादळी खेळीचं प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहे. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक वेगळाच पैलू समोर आणला आहे. वेदना होत होत्या, पण त्याला त्याचा फायदा झाल्याचं मत सचिन तेंडुलकरने मांडलं आहे.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक्सवर एक पोस्ट करत लिहिलं आहे की, क्रिकेट आणि जीवनात बरंच साम्य आहे. काही गोष्टी आपल्याला मागे खेचतात. पण त्यामुळे पुढे जाण्यास मदत होते. सचिन तेंडुलकरने मॅक्सवेलच्या वादळी खेळीचं पुढे तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केलं आहे.
‘क्रॅम्पमुळे मॅक्सवेलचं फुटवर्कला मर्यादा आल्या. त्यामुळे त्याला क्रिजमध्येच उभं राहावं लागलं होतं. पण त्याला आपलं डोकं स्थिर ठेवण्यास मदत झाली. तसेच तो प्रत्येक चेंडू व्यवस्थितरित्या पाहू शकत होता. तसेच त्याची नजर आणि हाताच्या हालचाल यांचं सूत्र जुळून येत होतं. त्यामुळे वेदना होऊनही जबरदस्त खेळला.’ असं सचिन तेंडुलकरने सांगितलं.
Life and cricket have many parallels. Sometimes, like a spring, what pulls you back is also what propels you forward.
During yesterday’s game, @Gmaxi_32’s cramps constrained his footwork. He had to stay put at the crease, but that enabled him to have a steady head, watch the… pic.twitter.com/8ZEp6m6gC8
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 8, 2023
खेळाच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये वेगवेगळे फूटवर्क आवश्यक असतं. कधी कधी फूटवर्क न करणं देखील चांगलं ठरतं, असं देखील सचिन तेंडुलकर शेवटी म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. 16 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचा सामना होणार असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.