Retirement: आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजाची निवृत्ती, शेन वॉर्नबद्दल म्हणाला…
Cricketer Retirement: आयपीएलच्या इतिहासात पहिली सुपर ओव्हर टाकणाऱ्या भारतीय गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे. हा बॉलर आयपीएलमध्ये 2 संघांकडून खेळला होता.
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला वेगवान गोलंदाज कामरान खान याने निवृत्तीची घोषणा केली आहे. कामरानने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टोरी पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे. कामरान अचूक यॉर्कर टाकायचा त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने त्याला ‘टॉरनेडो’ असं नाव दिलं होतं.’टॉरनेडो’ हे वादळाचं नाव आहे. कामरानने आयपीएलमधील 9 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या होत्या. इतकंच नाही, तर कामरान आयपीएल इतिहासातील पहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आहे.
कामरानने इंस्टा स्टोरीत काय म्हटंल?
कामरान खान याने इंस्टा स्टोरीत “गुडबाय आयपीएल”, असं म्हटलंय. “क्रिकेटवर मी जीवापाड प्रेम करतो. क्रिकेटने मला सर्वकाही दिलं,असंही कामरानने म्हटलं. तसेच कामरानने राजस्थान रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया टीममधील प्रशिक्षक, सहकाऱ्यांचे आणि सर्व मित्रांचे जाहीर आभार व्यक्त केले. तसेच कामरानने आपल्या स्टोरीत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न याचा उल्लेख केलाय. मी शेन वॉर्न सरांचा आभारी आहे, असं कामरानने म्हटलंय.
कामरानने 2009 साली कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सुपर ओव्हर टाकली होती. तेव्हा कॅप्टन शेन वॉर्न याचा कामरानला सुपर ओव्हर देण्याचा निर्णय योग्य ठरला होता. कामरान खानने तेव्हा सुपर ओव्हरमध्ये राजस्थानला विजय मिळवून दिला होता. कामरानने ख्रिस गेल आणि ब्रँडन मॅक्युलम या विस्फोटक फलंदाजांसमोर सुपर ओव्हर टाकली होती. कामरानने फक्त 15 धावा दिल्या होत्या. त्यानंतर युसूफ पठाणने राजस्थानला विजय मिळवून दिला.
कामरान खानची इंस्टा स्टोरी व्हायरल
कामरानची कारकीर्द
कामरान खानवर 2010 साली चकिंगचा आरोप झाला होता. कामरानला त्यामुळे बॉलिंग एक्शनवरुन एनओसी मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागलं. कामरानला ऑस्ट्रेलियातून हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर कामरान आयपीएलमध्ये 2011 साली पुणे फ्रँचायजीसह जोडला गेला. कामरानला हवी तशी संधी मिळाली नाही. कामरान आयपीएलमध्ये फक्त 9 सामने खेळला. कामरानने 9 सामन्यांमध्ये 8.4 इकॉनॉमी आणि 24.89 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या.