Rinku Singh GT vs KKR | रिंकू सिंह याची मॅचविनिंग खेळीनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
रिंकु सिंह कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकुने गुजरातचा विजयाचा घास हिसकावून घेतला. रिंकुचं या विजयी खेळीसाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अहमदाबाद | एकहाती सामना जिंकून देणं आणि मॅचविनर खेळाडू म्हणजे काय असतं हे कोलकाता नाईट रायडर्सच्या 25 वर्षीय रिंकू सिंह याने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. कोलकाताने जवळपास गमावलेला सामना रिंकून आपल्या एकट्याच्या जीवावर जिंकून दिलाय. रिंकूने गुजरात टायटन्स टीमचा त्यांच्याच घरात म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडयिममध्ये पराभव केलाय. गुजरातच्या हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास रिंकूने एका ओव्हरमध्ये हिसकावून घेतला.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकून कोलकाताला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी 100 धावांची शतकी भागीदारी केली. कोलकाताने सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. मात्र नितीश राणा 45 धावांवर आऊट झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने एकबाजू लावून धरली. वेंकटेश चांगला खेळत होता. पण वेंकटेश यानेही 83 धावांवर आऊट होत मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यामुळे कोलकाताची 4 बाद 154 अशी स्थिती झाली.
कोलकाताची सामन्यातून पिछेहाट झाली. यानंतर गुजरातचा हंगामी कॅप्टन राशिद खान ओव्हर टाकायला आला. राशिदने तो ज्यासाठी ओळखला जातो, ती कामगिरी त्याने कली. आपल्या फिरकीसमोर त्याने केकेआरच्या 3 धोकादायक फंलदाजांना आऊट करत हॅट्रिक घेतली. राशिदने कोलकाताच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये अनुक्रमे आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर या तिकडीला आऊट करत मोसमातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे गुजरात जिंकणार हे निश्चित झालं होतं. पण मैदानात रिंकू सिंह नावाचा डेंजर फलंदाज होता.
शेवटच्या ओव्हरचा थरार
कोलकाताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावांची गरज होती. रिंकू सिंह याच्यासोबत उमेश यादव हे दोघे बॅट्समन मैदानात होते. राशिदने यश दयाल याला ही ओव्हर टाकायला दिली. उमेश यादवने पहिल्या बॉलवर हुशारीने सिंगल काढत रिंकूला स्ट्राईक मिळवून दिली. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं.
रिंकून पाठी पुढे न पाहता धडाधड बॅट फिरवायला सुरुवात केली. रिंकूने शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कोलकाताला जिंकवलं. रिंकूने 21 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरसह नाबाद 48 धावांची खेळी केली.
रिंकूची पहिली प्रतिक्रिया
“मनात एक विश्वास होता की मी करु शकतो. कारण गेल्यावर्षी देखील मी लखनऊ विरुद्ध अशीच खेळी केली होती. अखेरपर्यंत खेळ विश्वास ठे, जे होईल ते पाहुत”, अशी पहिली प्रतिक्रिया रिंकूने विजयानंतर दिली.
रिंकू सिंह याची मॅचविनिंग खेळीनंतर पहिली प्रतिक्रियाhttps://t.co/djBSX1UwvW#RinkuSingh #GTvKKR #KKRvsGT #IPL2023
— Sanjay Patil (@patil23697) April 9, 2023
“जसा बॉल येत होता तसं मी खेळत होतो. फार ठरवून काही केलं नाही. 5 सिक्स मारेन असा विचार केला नव्हता. 5 सिक्स लागले, विश्वास होता आणि जिंकलो”, असंही रिंकूने विजयानंतर नमूद केलं.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.