GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : शुभमन गिलच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुंबई विरुद्धच्या सामन्यात केली कमाल
आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलचा फॉर्म कायम राहिला आहे. या सामन्यात अवघ्या 9 धावा करत त्याने मानाचं स्थान मिळवलं आहे.
मुंबई : आयपील 2023 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने चमकदार कामगिरी करत आयपीएल मानाची कॅप मिळवली आहे. मुंबई विरुद्ध 9 धावा करत शुभमन गिलने ऑरेंज कॅप मिळवली आहे. शुभमन गिलने फाफ डुप्लेसिस पछाडत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फाफ डुप्लेसिसने 14 सामन्यात 730 धावा केल्या होत्या. मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या 722 धावा होत्या. या सामन्यात 9 धावा करताच 730 धावांचा पल्ला पार केला आहे. यासह शुभमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
शुभमन गिलच्या आसपास देखील कोणीच नाही. कारण आरसीबीचं आव्हान संपुष्टात आल्याने हा मान शुभमनकडे कायम राहील असंच दिसत आहे. या शर्यतीत डिव्हॉन कॉनवे 625 धावांसह पाचव्या, तर ऋतुराज गायकवाड 564 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. सूर्यकुमार याद 544 धावांसह सातव्या स्थानावर आहे. या तिघांना शुभमनला मागे टाकायचं असेल तर 100 हून अधिक धावा कराव्या लागतील.
आतापर्यंत कोणाला मिळाली आहे ऑरेंज कॅप
- 2008 शॉर्न मार्श (पंजाब), 11 सामन्यात 616 धावा
- 2009 मॅथ्यु हेडन (चेन्नई), 12 सामन्यात 575 धावा
- 2010 सचिन तेंडुलकर (मुंबई), 15 सामन्यात 618 धावा
- 2011 ख्रिस गेल (बंगळुरु), 12 सामन्यात 608 धावा
- 2012 ख्रिस गेल (बंगळुरु), 15 सामन्यात 733 धावा
- 2013 मायकल हस्सी (चेन्नई), 16 सामन्यात 733 धावा
- 2014 रॉबिन उथप्पा (कोलकाता), 16 सामन्यात 660 धावा
- 2015 डेविड वॉर्नर (हैदराबाद), 14 सामन्यात 562 धावा
- 2016 विराट कोहली (बंगळुरु), 16 सामन्यात 973 धावा
- 2017 डेविड वॉर्नर (हैदराबाद), 14 सामन्यात 641 धावा
- 2018 केन विलियमसन (हैदराबाद), 17 सामन्यात 735 धावा
- 2019 डेविड वॉर्नर (हैदराबाद), 12 सामन्यात 692 धावा
- 2020 केएल राहुल (पंजाब), 14 सामन्यात 670 धावा
- 2021 ऋतुराज गायकडवाड (चेन्नई), 16 सामन्यात 635 धावा
- 2022 जोस बटलर (राजस्थान), 17 सामन्यात 863 धावा
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. मात्र ही आकडेवारी झाली साखळी फेरीतील. तर आता ही क्वालिफायर 2 म्हणजे सेमी फायनल मॅच आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दोन्ही संघ जीव तोडून प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे फक्त आकड्यानुसार कोणत्याही टीमला गृहीत धरुन चालणार नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.