हरभजन सिंग टीम इंडियाचा हेड कोच? आणखी एका नावामुळे चर्चांना उधाण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने ही स्पर्धा संपण्यापू्र्वीच मुख्य प्रशिक्षकपदाचा शोध सुरु केला आहे. गौतम गंभीरनंतर आता आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली आहे. हरभजन सिंगने स्वत: प्रशिक्षपदाची इच्छा व्यक्त केली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ 30 जून 2024 रोजी संपणार आहे. तर नव्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 1 जुलै ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. यासाठी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. गेल्या दिवसांपासून या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरु आहे. काही विदेशी आणि भारतीय माजी क्रिकेटपटूंनी या पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर बीसीसीआयनेही काही माजी क्रिकेटपटूंकडे मुख्य प्रशिक्षपद भूषविण्यासाठी विनवणी केल्याचं समोर येत आहे. रिपोर्टनुसार स्टीफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पण फ्लेमिंगसोबतची चर्चा फिस्कटल्याने गौतम गंभीरचं नाव निश्चित मानलं जात आहे. आता या सर्व नावांची चर्चा होताना हरभजन सिंगने गुगली टाकली आहे. हरभजन सिंगनेही मुख्य प्रशिक्षपद भूषविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे गौतम गंभीर की हरभजन सिंग असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हरभजन सिंगने एएनआयशी बोलताना सांगितलं की, “क्रिकेटने त्यांना बरंच काही दिलं आहे. जर भारतीय संघाला परत काही देण्याची संधी मिळाली तर खूपच आनंद होईल.” हरभजन सिंगने पुढे असंही सांगितलं की, “मला माहिती नाही मी या पदासाठी अर्ज करेल की नाही.” हरभजन सिंगच्या या वक्तव्यानंतर आता गौतम गंभीरसोबत आणखी भारतीय खेळाडू शर्यतीत आला आहे. “हे काम भारतीय खेळाडूंना शिकवण्यापेक्षा व्यवस्थापन करण्याचं आहे. भारतीय खेळाडूंना माहिती आहे की कसा ड्राईव्ह मारायचा आणि पुल शॉट मारायचा ते”, असंही तो पुढे म्हणाला.
बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी करेल. त्यानंतर उमेदवार निश्चित केला जाईल आणि मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्जासाठी काही अटी ठेवल्या आहे. या पदासाठी ज्या व्यक्तीचं वय 60 पेक्षा कमी असेल तीच व्यक्ती अर्ज करू शकते. दुसरीकडे, त्या खेळाडूने कमीत कमी 30 कसोटी आणि 50 वनडे खेळला असेल.
एखाद्या देशाच्या कसोटी संघाचं दोन वर्षापर्यंत कोचिंग केलं असेल अशी व्यक्ती अर्ज करू शकते. या शिवाय आयपीएल, एसोसिएट मेंबर, इंटरनॅशनल लीग, फर्स्ट क्लास टीम किंवा नॅशनल ए संघासाठी तीन वर्षे कोचिंग केलेली व्यक्तीही अर्ज करू शकते. त्याचबरोबर बीसीसीआयकडू लेवल 3 किंवा त्या बरोबरीचे सर्टिफिकेट प्राप्त केलेले कोचही अर्ज करू शकतात.